2018 ची घटना अमान्य, 2019 चा एबी फॉर्म मान्य, शिवसेना निकालानंतर काय झाले व्हायरल
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेचा निकाल दिला. हा निकाल देताना कोणताही पक्ष चालविण्यासाठी त्या त्या पक्षाची घटना, त्यातील नियमानुसार पदाधिकारी, नेते निवडले जातात, असे म्हटले. त्यानंतर 2019 मधील एकनाथ शिंदे यांनी केलेले एक ट्विट व्हायरल झाले आहे. 2018 ची घटना अमान्य, 2019 चा एबी फॉर्म मान्य अशी टॅग लाईनचे हे ट्विट आहे.
मुंबई, दि. 11 जानेवारी 2024 | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी शिवसेनेसंदर्भात पक्ष आणि अपात्र आमदार यांच्यासंदर्भात निर्णय दिला. त्यांनी निकालात एकनाथ शिंदे यांचा पक्ष हीच खरी शिवसेना असल्याचे म्हटले. त्याचवेळी शिवसेनेची 2018 ची घटना अमान्य केली. निकाल देताना त्यांनी 1999 च्या शिवसेनेचा घटनेचा आधार घेतला. राहुल नार्वेकर यांनी पक्षप्रमुख मनमर्जीने कुणालाही हटवू शकत नाही, असे स्पष्ट करताना 2018 मधील घटना दुरुस्ती अमान्य केली. त्यानंतर सोशल मीडियावर एक जुने ट्विट व्हायरल झाले आहे. 2018 ची घटना अमान्य, 2019 चा एबी फॉर्म मान्य अशी टॅग लाईन करुन हे ट्विट व्हायरल झाले आहे. या ट्विटवर सोशल मीडियात अनेक कॉमेंट पडत आहे.
काय आहे नेमके ट्विट
सन २०१९ मधील एकनाथ शिंदे यांनी केलेले ट्विट आहे. विधानसभा निवडणुकीसाठी कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदार संघातून शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदे यांना उमेदवारी दिली.
त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, ‘शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आज विधानसभा निवडणूक २०१९ करिता कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म देऊन पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दर्शवला. मा. उद्धवजी ठाकरे साहेबांचे मनस्वी आभार.’ एकनाथ शिंदे यांचे हे ट्विट आता व्हायरल झाले आहे. त्यात 2018 ची घटना अमान्य, 2019 चा एबी फॉर्म मान्य, असे कसे असा प्रश्न युजर्सने विचारला आहे.
उद्धव ठाकरे अन् आदित्य यांना केले टॅग
एकनाथ शिंदे यांनी 30 सप्टेंबर 2019 रोजी हे ट्विट केले होते. ज्यामध्ये दोन फोटो दिले गेले आहे. एका फोटोत AB फॉर्म उद्धव ठाकरे यांच्याकडून घेताना एकनाथ शिंदे दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी हे ट्वीट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना त्यावेळी टॅगही केले होते.आता एकनाथ शिंदे यांचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यातून काही जण मुख्यमंत्री शिंदेंवर टीका करत आहे तर काही जण पाठिंबा देताना दिसत आहे.
अंबादास दानवे यांचे ट्विट
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विट केले. त्यांनी म्हटले की, मुख्यमंत्री शिंदे यांना २०१९ साली विधानसभेचा एबी फॉर्म घेताना घटना दुरुस्ती, घराणेशाही, एकधिकारशाही वगैरे वगैरे तुम्हाला दिसली नव्हती. हुडी घालून आलेला माणूस रात्रीतून कानगोष्टी करून गेला आणि तुम्हाला अचानक साक्षात्कार झाला होता का?
मुख्यमंत्री शिंदे यांना २०१९ साली विधानसभेचा एबी फॉर्म घेताना घटना दुरुस्ती, घराणेशाही, एकधिकारशाही वगैरे वगैरे तुम्हाला दिसली नव्हती. हुडी घालून आलेला माणूस रात्रीतून कानगोष्टी करून गेला आणि तुम्हाला अचानक साक्षात्कार झाला होता का? #ShivsenaUBT… pic.twitter.com/OKYsWZErW3
— Ambadas Danve (@iambadasdanve) January 11, 2024