‘तुम्ही मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी’, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात
"मराठा समाजाचं आरक्षण घालवायला तुम्ही जबाबदार आहात. आम्ही ते आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली आहे. जस्टीस भोसले, गायकवाड, शिंदे कमिटी गठीत केली आहे. आयोगाला इम्पेरिकल डेटा युद्ध पातळीवर गोळा करण्याच्या सूचना दिल्या आहेत", असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मुंबई | 31 ऑक्टोबर 2023 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावरुन राज्य सरकारवर आज निशाणा साधला. त्यांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय. “मराठी बाण्यावर बोलणाऱ्यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. कारण त्यांना मराठा समाजाबद्दल किती संवेदना आहेत हे मराठा समाजालादेखील माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्याकाळात मराठा समाजाला आरक्षण दिलं. हायकोर्टात ते चॅलेंज झालं. पण ते टिकवण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि आम्ही केलं”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“सुप्रीम कोर्टात ते प्रकरण गेल्यानंतर त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होतं? उपसमितीचे अध्यक्ष कोण होतं? त्यांनी हे आरक्षण टिकवलं नाही. खरंतर मराठा समाजाच्या आरक्षणाचे मारेकरी खऱ्या अर्थाने तुम्ही आहात. त्यामुळे तुम्हाला मराठा समाजाच्या आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. तुम्ही मराठा समाजाच्या महिलांच्या मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणून हिणवणारे, माता-भगिणींचा अपमान करणारे कोण होतं हे देखील सखल मराठा समाजाला माहिती आहे”, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
‘आरक्षण घालवायला तुम्ही जबाबदार’
“मराठा समाजाचं आरक्षण घालवायला तुम्ही जबाबदार आहात. आम्ही ते आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली आहे. जस्टीस भोसले, गायकवाड, शिंदे कमिटी गठीत केली आहे. आयोगाला इम्पेरिकल डेटा युद्ध पातळीवर गोळा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आम्ही प्रामाणिकपणे आमचं सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. या सर्वाला कारणीभूत असणाऱ्यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा अधिकार उरलेला नाही”, असा घणाघात एकनाथ शिंदेंनी केला.
‘त्यांच्या पायाखालची जमीन सरकलीय’
“मराठा आरक्षण हायकोर्टात टिकलं तेव्हा किती लक्ष दिलं? तुम्ही किती पुरावे दिले? मराठा समाज हा फॉरवर्ड आहे, मागास नाही हे न्यायालयाने जेव्हा म्हटलं त्यावेळी मराठा समाज मागास कसा आहे याचे सर्व पुरावे तुम्ही न्यायालयात द्यायला हवे होते. तुम्ही तिथे कमी पडलात. अपयशी झाला. तुम्ही मुद्दाम केलं. या सर्व गोष्टी मराठा समाजाला माहिती आहे आहे”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
“मराठा समाज शिस्तप्रिय आहे. मराठा समाज शांततेने आंदोलन करणारा आहे. मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याची जबाबदारी आमची आहे. आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत. आमचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आम्ही करु शकलो नाही, पण हे करण्याचं प्रयत्न करत आहेत, असं त्यांना वाटत आहेत”, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.