…तर तुमच्या पगारातून 20 टक्के रक्कम कापली जाणार, आयकर विभागाचा नवा नियम
केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने हा नवा नियम लागू केला आहे. 16 जानेवारीपासून हा नियम लागू झाला असून या नियमाबाबत 86 पानाचं परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.
नवी दिल्ली : आयकर विभागाने कर संकलन वाढवण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत. या नियमानुसार तुमचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर हा नियम तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे (Income Tax Department). तुम्ही काम करत असलेल्या कंपनीला तुमच्या आधारकार्ड आणि पॅनकार्डची माहिती देणे आता बंधनकारक असणार आहे. अन्यथा तुमच्या पगारातून 20 टक्के रक्कम कापली जाणार आहे. ही रक्कम टीडीएसच्या रुपात कापली जाणार आहे (Income Tax Department).
केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने हा नवा नियम लागू केला आहे. 16 जानेवारीपासून हा नियम लागू झाला असून या नियमाबाबत 86 पानाचं परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. या परिपत्रकात म्हटलं आहे की, कलम 206 (एए) अंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांनी आपल्या कंपनीला आधारकार्ड आणि पॅनकार्डची माहिती देणं अनिवार्य आहे. अन्यथा त्याच्या पगारातून 20 टक्के टीडीएस कापला जाणार आहे.
तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल तर कोणत्याही प्रकारचा कर आकारला जाणार नाही. दरम्यान, हा नवा नियम लागू का केला? याबाबत केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने माहिती दिली आहे. कर्मचाऱ्यांनी आधारकार्ड आणि पॅनकार्ड न दिल्यामुळे क्रेडीट संदर्भातील कामात प्रचंड अडचणी येत आहेत. त्यामुळे आधारकार्ड आणि पॅनकार्डची माहिती कंपनीला देण्याचे आदेश केंद्रीय प्रत्यक्ष बोर्डाने दिले आहेत.