Employment : राज्यात मे मध्ये 21 हजार 556 बेरोजगारांना रोजगार, मंत्री राजेश टोपे यांची माहिती
विविध उपक्रमांमधून राज्यात जानेवारी ते मे 2022 अखेर 68 हजार 443 उमेदवार नोकरीस लागले आहेत. मागील वर्षी 2021 मध्ये राज्यात 2 लाख 19 हजार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले. तत्पूर्वी 2020 मध्ये 1 लाख 99 हजार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले.
मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारी (Unemployment)ची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये मे 2022 मध्ये 21 हजार 556 बेरोजगार उमेदवारांना रोजगार (Employment) मिळवून देण्यात आला असल्याची माहिती या विभागाचे मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरी इच्छुक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो, असे त्यांनी सांगितले.
बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी वेबपोर्टल
विविध उपक्रमांमधून राज्यात जानेवारी ते मे 2022 अखेर 68 हजार 443 उमेदवार नोकरीस लागले आहेत. मागील वर्षी 2021 मध्ये राज्यात 2 लाख 19 हजार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले. तत्पूर्वी 2020 मध्ये 1 लाख 99 हजार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले. बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे.
या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरी इच्छुक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते.
नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी
विभागाकडे तसेच महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत 95 हजार 450 इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरी इच्छुक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असेही टोपे यांनी सांगितले.
टोपे म्हणाले की, मे 2022 मध्ये विभागाकडे 33 हजार 677 इतक्या नोकरी इच्छुक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात 5 हजार 679, नाशिक विभागात 4 हजार 395, पुणे विभागात 18 हजार 158, औरंगाबाद विभागात 2 हजार 226, अमरावती विभागात 1 हजार 500 तर नागपूर विभागात 1 हजार 719 बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.
मे महिन्यामध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे 21 हजार 556 उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात 4 हजार 027, नाशिक विभागात 2 हजार 327, पुणे विभागात सर्वाधिक 14 हजार 313, औरंगाबाद विभागात 333, अमरावती विभागात 348 तर नागपूर विभागात 208 बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले. नोकरी इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन टोपे यांनी केले आहे. (Employment of 21 thousand 556 unemployed in the state in May, information of Minister Rajesh Tope)