पत्नीच्या आजारपणाचं कारण, डॉन अरुण गवळीला पॅरोल मंजूर
कुख्यात डॉन अरुण गवळीला (Gangster Arun Gawli) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठीने पॅरोल मंजूर केला आहे.
नागपूर : कुख्यात डॉन अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठीने पॅरोल मंजूर केला आहे. अरुण गवळी (Gangster Arun Gawli) सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. पत्नी आजारी असल्याच्या कारणास्तव गवळीने 30 दिवसांची पॅरोल रजा मागितली होती.
नागपूर विभागीय आयुक्तांनी अरुण गवळीचा पॅरोलचा अर्ज फेटाळला होता. त्यामुळे गवळीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर उच्च न्यायालयाने गवळीला दिलासा देत पॅरोल मंजूर केला आहे.
अरुण गवळी (Gangster Arun Gawli) शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. याआधी, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर केली होती. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचा टप्पा पार पडल्यानंतर, म्हणजेच 30 एप्रिल 2019 रोजी गवळी पॅरोलवर मुंबईत आला होता.
अरुण गवळी याआधीही 3 ते 4 वेळा जेलबाहेर आला आहे. मुलाचं लग्न, आजारपण अशी कारणं देत अरुण गवळी जेलबाहेर आला होता.
काय आहे कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरण?
शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांचा सदाशिव सुर्वे नावाच्या व्यक्तीशी संपत्तीवरुन वाद होता. त्यानंतर सदाशिव सुर्वेने अरुण गवळीच्या गँगमधील दोघांना जामसांडेकर यांची हत्या करण्याची सुपारी दिल्याचा आरोप आहे. दोघांनी सदाशिवची अरुण गवळीशी भेट घालून दिली. गवळीने हत्या करण्यासाठी 30 लाखांची रक्कम मागितली.
सदाशिवने 30 लाखांची रक्कम देण्याची तयारी दर्शवली. अरुण गवळीने आपल्यावर संशय येऊ नये म्हणून प्रताप गोडसेला जामसंडेकरांच्या हत्येसाठी नवे शूटर शोधण्यास सांगितलं. गोडसेने नवे शूटर शोधण्याचे काम श्रीकृष्ण गुरव या साथीदाराकडे दिलं. श्रीकृष्णने नरेंद्र गिरी आणि विजयकुमार गिरी यांची निवड केली. तसेच त्यांना प्रत्येकी अडीच लाख रुपये देण्याचे कबूल केले. यापैकी प्रत्येकी 20 हजार रुपयांचा अॅडव्हान्सही देण्यात आला होता.
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, विजयकुमार गिरीने अशोक कुमार जयस्वार या सहकाऱ्यासह जवळजवळ 15 दिवस कमलाकर जामसंडेकरांवर लक्ष ठेवलं. त्यानंतर 2 मार्च 2007 रोजी जामसंडेकर यांच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली. गवळीला या घटनेनंतर एका वर्षाने पकडण्यात आलं. तत्कालीन गुन्हे शाखेचे प्रमुख राकेश मारिया, अतिरिक्त पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस निरिक्षक दिनेश कदम, धनंजय दौंड, नीनाध सावंत, योगेश चव्हाण यांच्या पथकाने अरुण गवळीला अटक केली होती.