भीमा कोरेगाव हिंसाचाराचा आरोप, जेलमधून सुटका, पण आता नजरकैदेत, गौतम नवलखा यांच्याबद्दल कोर्टाचा नेमका निर्णय काय?
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी आरोपी असलेले मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांची तळोजा कारागृहातून सुटका झालीय. पण यापुढे त्यांना नजरकैदेत ठेवलं जाणार आहे.
नवी मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी आरोपी असलेले मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांची तळोजा कारागृहातून सुटका झालीय. त्यामुळे त्यांना दिलासा मिळालाय, असं मानलं जातं आहे. पण तरीही नवलखा यांना नजरकैदेकत राहावं लागणार आहे. वृद्धत्व आणि प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना घरी नजरकैदेत ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
आपल्याला तळोजा कारागृहातील न्यायालयीन कोठडीऐवजी स्वत:च्या घरीच नजरकैदेत ठेवण्यात यावे, अशी विनंती नवलखांनी सुप्रीम कोर्टाला केली होती. त्यानंतर कोर्टाने त्यांची ही विनंती मान्य करत महाराष्ट्र सरकारला या प्रक्रियेसाठी आवश्यक तयारीचा आढावा घेण्यास सांगितले होते.
हा आढावा पार पडल्यानंतर नवलखा यांना नवी मुंबई बेलापूर येथील अग्रोळी गावातल्या त्यांच्या घरी कडक सुरक्षा बंदोबस्तात नजरकैदेत ठेवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली होती.
या दरम्यान नवलखा यांची आज संध्याकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास तळोजा कारागृहातून सुटका झाली. त्यानंतर त्यांना त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवणार येणार असल्याची माहिती समोर आली होती.
दुसरीकडे नवलखा यांनी आपल्याला कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यालयात नजरकैदेत ठेवावं, अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळे नवी मुंबईतील एका कार्यालयात त्यांना नजरकैदेत ठेवलं जाणार असल्याची चर्चा होती. पण त्यांना बेलापूरमधील अग्रोळी गावातल्या त्यांच्या घरी कडक सुरक्षा बंदोबस्तात नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे.
दरम्यान, याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने एनआयएला फटकारल्याची माहिती समोर लीय. एनआयएने पळवाटा शोधू नये, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने सुनावल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.