बाळासाहेब आणि या नेत्यात मुंबई बंद करायची हिंमत होती, या नेत्याचा आज स्मृती दिवस
जॉर्ज फर्नांडिस यांच्या आधी मुंबईवर स. का. पाटील यांचे वर्चस्व होते. मला 'देव सुद्धा मला हरवू शकणार नाही' असे ते म्हणत. परंतु 1967साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत जॉर्ज फर्नांडिस यांनी त्यांचा पराभव केला.
मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आधी म्हणजे 1960 मध्ये त्यांची मुंबईचा सम्राट म्हणून ओळख होती. त्यांच्या एका इशाऱ्यावर मुंबई बंद होत होती. शिवसेनेच्या आधी मुंबई बंद करु शकणारे ते एकमेव नेते होते . 1967 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते एस.के. पाटील यांचा त्यांनी पराभव केला अन् ते राष्ट्रीय पातळीवर प्रकाशझोतात आले. आता त्या नेत्याचे नाव तुम्हाला समजलेच असेल. होय, माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस. 29 जानेवारी हा त्यांचा स्मृती दिवस.
शिवसेना प्रमुख बाळसाहेब ठाकरे यांच्यांसंदर्भात आजच्या पिढीला चांगली माहिती आहे. परंतु बाळासाहेबांच्या आधी मुंबई बंदचे जॉर्ज फर्नांडिस आव्हान करत, तेव्हा मुंबई ठप्प होत होती. त्यांची माहिती आज 60 च्या वर असणाऱ्यांना चांगलीच आहे.
‘जायंट किलर’ का म्हणतात
जॉर्ज फर्नांडिस यांच्या आधी मुंबईवर स. का. पाटील यांचे वर्चस्व होते. मला ‘देव सुद्धा मला हरवू शकणार नाही’ असे ते म्हणत. परंतु 1967साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत जॉर्ज फर्नांडिस यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर जॉर्ज फर्नांडिस यांची ओळख ‘जायंट किलर’ म्हणून तयार झाली.
कसा झाला होता विजय
जॉर्ज फर्नांडिस यांचा जेव्हा कळाले की स.का. पाटील म्हणतात, मला देव आला तरी मला हरवू शकणार नाही. त्यानंतर त्यांनी एक पोस्टर तयार केले. त्यात म्हटले की, पाटील म्हणतात मला देव सुद्धा हरवू शकणार नाही, पण तुम्ही (जनता) त्यांना हरवू शकता. फर्नांडिसांचे हे पोस्टर चांगलेच चर्चेत आले. निकाल जेव्हा लागला तेव्हा स.का.पाटील यांचा 42 हजार मतांनी पराभव झाला होता.
कामगार नेते ते राजकीय नेते
जॉर्ज यांनी 1967 ची लोकसभा निवडणूक लढण्यापूर्वी मुंबई महानगरपालिका कामगारांच्या संपाचे यशस्वी नेतृत्व केले होते. मुंबई महापालिका, बेस्ट, हॉटेल वर्कर्स, फेरीवाले यांच्या संघटनेचा ते नेता बनले. त्यांच्या मागण्यांसाठी ते मुंबई बंद करत होते. त्यामुळे त्यांना ‘बंद सम्राट’ अशी पदवी देण्यात आली होती. मधू दंडवते यांनी प्रजा सोशालिस्ट पार्टीचे नेतृत्व केले, तर फर्नांडिस यांनी युनायटेड सोशालिस्ट पार्टीचे नेतृत्व केले. दोघांनी एकत्र येऊन समाजवादी पक्षाची स्थापना केली. समाजवादी पक्षाने 1968 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा दिला.
रेल्वेचा संप देशात गाजला
1974ला रेल्वेचा देशव्यापी संप फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली पुकारला गेला होता. त्यावेळी त्यांच्यांबरोबर अंदाजे 30 हजार जणांना तुरुंगात टाकण्यात आलं होते. देशभर गाजलेला हा संप इंदिरा गांधी यांच्या प्रशासनाने मोडून काढला होता.
19 व्या वर्षी आले मुंबईत
कर्नाटकात ख्रिश्चन कॅथलिक कुटुंबात जार्ज यांचा 1930 मध्ये जन्म झाला. त्यांनी धर्मोपदेशक बनावं, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. परंतु ते त्यांना मान्य नव्हते. त्यामुळे 1949 साली नोकरीच्या शोधात ते मुंबईत आले. तेव्हा ते 19 वर्षांचे होते. मुंबईत काम करता करता ते युनियन लीडर्सच्या संपर्कात आले. त्यांच्यातल्या वक्तृत्व आणि नेतृत्व गुणांमुळे ते कामगारांचे नेते झाले.