कसारा घाटात मालगाडी घसरली, रेल्वे वाहतूक विस्कळीत, अनेक गाड्या रद्द
railway accident | कसारा आणि इगतपुरी दरम्यान डाऊन लाईनवर मालगाडीचे डबे रुळावरून घसरले आहे. यामुळे सोमवारी सकाळी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. डबे हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने यामुळे हजारो प्रवाशांना फटका बसला.
सुनिल जाधव, ठाणे | 11 डिसेंबर 2023 : कसारा घाटात मालगाडी घसरल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. कसारा आणि इगतपुरी दरम्यान डाऊन लाईनवर मालगाडीचे सात डबे रुळावरून घसरले आहे. यामुळे सोमवारी सकाळी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. मात्र, लोकल सेवा सुरु आहे. मध्य रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. मालगाडी घसरल्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला आहे. मुंबईकडून नाशिकमार्गे जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलले तर काही गाड्या रद्द केल्या आहेत. एकूण 20 गाड्यांचे मार्ग बदलले तर पाच गाड्या रद्द केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
कुठे झाला अपघात
कसारा आणि इगतपुरीदरम्यान डाउन लाईनवर कसारा रेल्वे स्टेशन ते TGR-3 दरम्यान रविवारी संध्याकाळी ६.३१ वाजता अपघात झाला. या अपघातात मालगाडीचे सात डबे रुळावरून घसरले. त्यानंतर कसारा ते इगतपुरी दरम्यानची रेल्वे वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली होती. मालगाडीचे डबे रुळावरुन हटवण्यासाठी क्रेन मागवण्यात आली. डबे हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले. रेल्वे अपघातामुळे काही गाड्या रद्द झाल्या तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. यामुळे हजारो प्रवाशांना फटका बसला.
या गाड्यांचे मार्ग बदलले
- 17612 सीएसटीएम नांदेड एक्स्प्रेस ही गाडी कल्याणवरुन पुणे दौंड मार्गे वळवण्यात आली.
- 12105 सीएसटीएम गोंदिया एक्स्प्रेस कल्याणवरुन पुणे दौंड मनमाड मार्गे वळवण्यात आली.
- 12137 पंजाब मेल ही गाडी दिवा, वसई, उधना, जळगाव मार्गे वळवण्यात आली.
- 12289 सीएसटीएम नागपूर दुरांतो एक्स्प्रेस वसई, उधना, जळगाव मार्गे वळवण्यात आली.
- 12111 सीएसटीएम अमरावती कल्याण, पुणे दौंड मार्ग पाठवण्यात आली.
- 12809 सीएसटीएम हवडा वसई, उधना, जळगाव मार्गे वळवण्यात आली.
- 17057 सीएसटीएम- सिंकदराबाद कल्याण, पुणे दौंड मार्ग पाठवण्यात आली.
- 12322 सीएसटीएम हवडा- वसई, उधना, जळगाव मार्गे वळवण्यात आली.
- 18029 शालीमार वसई, उधना, जळगाव मार्गे वळवण्यात आली.
- 12167 वाराणसी वसई, उधना, जळगाव मार्गे वळवण्यात आली.
- 12141 पाटलीपुत्र वसई, उधना, जळगाव मार्गे वळवण्यात आली.
लवकरच अतिरिक्त ३० लोकल धावणार
पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलने दररोज जीव मुठीत धरून दाटीवाटीने प्रवास करणाऱ्या हजारो चाकरमान्यांना खूशखबर आहे. पश्चिम रेल्वेवर लवकरच अतिरिक्त ३० लोकल धावणार आहे. चाकरमान्यांची प्रचंड गर्दी असलेल्या या मार्गावर गोरेगाव ते बोरिवली दरम्यान सहावी मार्गिका टाकली जात आहे. या मार्गिकेचे काम एप्रिल-मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे रेल्वेचे नियोजन आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर चर्चगेट-विरार दरम्यान तब्बल २५-३० अतिरिक्त लोकल चालवणे शक्य होणार आहे. नव्या लोकल फेऱ्या वाढणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे