Balasaheb Thackeray Jayanti: बाळासाहेब असते तर विरोधकांची कावकाव, चिवचिव, फडफड, तडफड थंड पडली असती; राऊतांचा हल्लाबोल
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज असते तर विरोधकांची जी काही कावकाव, चिवचिव, फडफड आणि तडफड थांबली असती, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली.
मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज असते तर विरोधकांची जी काही कावकाव, चिवचिव, फडफड आणि तडफड थांबली असती, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली. आज जे काही घडत आहे, घडवलं जात आहे ते केवळ बाळासाहेबांच्या प्रेरणेतूनच घडतंय, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांना आज बाळासाहेब असते तर काय चित्रं असतं? असं विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. आज बाळासाहेब असते तर तुम्ही म्हणता काय झालं असतं… आज बाळासाहेब असते तर बऱ्याच गोष्टी झाल्या नसत्या आणि नव्याने काही घडल्या असत्या. विशेषता विरोधी पक्षात जी काव काव चिवचिव सुरू आहे. फडफड सुरू आहे तडफड सुरू आहे ती बाळासाहेबांच्या अस्तित्वानेच थंड पडली असती. बाळासाहेबांचा स्वभाव हा सौ सोनार की एक लोहरकी असा होता. बाळासाहेबांचा शब्द म्हणजे धनुष्यातून सुटलेला बाण होता. बंदुकीची गोळी होती. ती वेधच घ्यायची. नेम चुकत नव्हता कधी, असं राऊत म्हणाले.
जे घडतंय ते बाळासाहेबांच्या आशीर्वादाने
बाळासाहेब आज असते तर 96 वर्षाचे असते. त्यांचा वाढदिवस आम्ही राज्यात, राज्याबाहेर अनेक वर्ष उत्सवाच्या स्वरुपात साजरा करत आलो. बाळासाहेबांविषयी बोलताना आजही वाटतं ते आमच्या आसपास आहेत. त्यांच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेतूनच जे घडतंय सगळं ते घडवलं जातंय. बाळासाहेबांनी महाराष्ट्र आणि देशाला केवळ राजकीय दिशा दिली असे नाही, अनेक गोष्टी दिल्या. त्या शिदोरीवर महाराष्ट्र आणि देश पुढे चालला आहे, असं ते म्हणाले.
कुणाचीही पोपटपंची चालली नाही
महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाला स्वाभिमान आणि अन्यायाविरोधात लढण्याचं बळ बाळासाहेबांनी दिलं. देशाला तुम्ही हिंदू आहात आणि हा देश हिंदुंचा आहे ही ओळख प्राप्त करून दिली. आज कोणी काही म्हणू द्या. गर्व से कहो हम हिंदू है, मराठी आहोत हा आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांनी महाराष्ट्र अभेद्य आणि अखंड ठेवला. ते होते तोपर्यंत कुणाचीही पोपटपंची चालली नाही. अर्थात आताही चालणार नाही कारण अजूनही बाळासाहेबांचा विचार कायम आहेत, असं त्यांनी सांगितलं.
प्रत्येकाला वाटायचं बाळासाहेबांना भेटावं
राजकीय मतभेद असतीलही. पण प्रत्येक राजकीय नेत्याला वाटायचं बाळासाहेबांना भेटावं आणि त्यांच्याशी बोलावं. जे भेटू शकले नाहीत ते आजही हळहळतात. आम्ही आयुष्यात सर्व काही पाहिलं अनुभवलं पण बाळासाहेबांना भेटण्याची इच्छा अपूर्ण राहिली. हे बाळासाहेबांच्या जीवनाचं सर्वात मोठं यश आहे प्रत्येकाला त्यांच्या जवळ जावंसं वाटतं होतं, असं ते म्हणाले.
बाळासाहेबांचे जीवन म्हणजे अग्निकुंड
मराठी माणूस त्यांचा सदैव ऋणी राहिल. मराठी आहे हे जे आपण देशात अभिमानाने सांगतो त्याचं सर्व श्रेय बाळासाहेबांच्या त्यागाला आणि संघर्षाला आहे, असं सांगतानाच त्यांनी कधी कुणावर अन्याय होऊ दिला नाही. ते सत्य न्याय आणि स्वाभिमानाचं प्रतिक होतं. त्यांचं जीवन म्हणजे अग्निकुंड होते. त्यातून त्यांनी महाराष्ट्रातील विचाराचा वणवा पेटत राहिला, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 23 January 2022 -tv9https://t.co/tPqRGHcW4y#BreakingNews | #NewsUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 23, 2022
संबंधित बातम्या:
Video | बाळासाहेब ठाकरे यांची आज 96वी जयंती, आदित्य ठाकरे यांच्याकडून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा