छत्र्या विसरू नका रे… पुढच्या दोन दिवसात मुंबईसह महाराष्ट्रात धुवाँधार, अलर्ट जारी; मुंबईत 6 जणांचा मृत्यू
गेल्या 24 तासात पावसाने मुंबईला येथेच्छ झोडपून काढले आहे. त्यानंतर आता पुढील 48 तास पावसाचेच असणार आहेत. मुंबईसह मध्यमहाराष्ट्रात दोन दिवसात धुवाँधार पाऊस होणार आहे.
मुंबई : मुंबईसह राज्यात शनिवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे राज्यात गारवा निर्माण झाला आहे. तसेच उशिरा का होईना पण पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजाही सुखावला आहे. मुंबईत तर पावसाने दाणादाण उडवली आहे. मुंबईत जोरदार पाऊस बरसल्याने अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. बोरिवली, दहिसर आणि जोगेश्वरी परिसरात तर घरांमध्ये पाणी भरले आहे. त्यामुळे टीव्ही, फ्रिज वाहून जाताना दिसत आहेत. मुंबईत चार ठिकाणी घर कोसळले आहे. दोन दिवसाच्या पावसाने मुंबईत सहा जणांचा जीव घेतला आहे. ही सर्व दाणादाण उडालेली असतानाच मुंबईत पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचे असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे. हवामान खात्याने तसा अलर्टही जारी केला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढच्या दोन दिवसात समुद्र किनारावरील भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईकरांनो घराबाहेर पडताना छत्र्या आणि रेनकोट घेऊनच घराबाहेर पडा. नाही तर अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
दोन दिवस जोरदार पाऊस का?
बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. गुजरातच्या कच्छ भागात घोंघावणारं वादळ आणि महाराष्ट्राच्या समुद्र किनारी भागापासून ते कर्नाटकपर्यंत पसरलेली सक्रिया ट्रफ आदी कारणांमुळे येत्या 48 तासात कोकणसहीत मुंबई आणि मध्य महाराष्ट्रात अति जोरदार पाऊस पडणार आहे. बऱ्याच कालावधीनंतर दक्षिण-पश्चिम मान्सून वेगाने पुढे सरकत असून अधिकाधिक क्षेत्रांना व्यापून टाकत आहे.
24 तासात पाणीच पाणी
मुंबईत गेल्या 24 तासात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. त्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच रविवारी मुंबई आणि दिल्लीत पहिल्यांदाच पाऊस पडला. मुंबईत गेल्या 24 तासात 86 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे अंधेरीच्या मिलन सबवेमध्ये पाणी भरले होते. त्यामुळे मिलन सबवेमध्ये फ्रिज आणि कपाटे वाहून आली होती. पंपाद्वारे या पाण्याचा उपसा केला जात आहे.