IPS Rashmi Shukla | सर्वात मोठी बातमी, महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती होणार?
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार असताना रश्मी शुक्ला या राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त होत्या. त्यावेळी त्यांनी राजकीय नेत्यांचे अवैधरित्या फोन टॅप करुन देवेंद्र फडणवीस यांना माहिती पुरवल्याचा आरोप करण्यात आला होता.
मुंबई | 3 सप्टेंबर 2023 : महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. तर सध्याचे राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ठरण्याची शक्यता आहेत. दरम्यान, रजनीश सेठ यांनी व्हीआरएस घेऊन नवी जबाबदारी स्वीकारली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. सेठ हे येत्या डिसेंबरमध्ये रिटायर होणार होते. त्याआधी त्यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तर रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार असताना रश्मी शुक्ला या राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त होत्या. त्यावेळी त्यांनी राजकीय नेत्यांचे अवैधरित्या फोन टॅप करुन देवेंद्र फडणवीस यांना माहिती पुरवल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, रश्मी शुक्ला यांनी याप्रकरणी कोर्टात भूमिका मांडली होती. राजकीय हेतून प्रेरित होवून आपलं नाव या प्रकरणात गोवण्यात आल्याचं रश्मी शुक्ला यांनी कोर्टात सांगितलं होतं.
कोर्टाकडून रश्मी शुक्ला यांना दिलासा
रश्मी शुक्ला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा फोन टॅप करुन त्यांच्या संभाषणाची माहिती देवेंद्र फडणीस यांना दिल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर पुण्यात पोलीस आयुक्त असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोन टॅप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी कोर्टात रश्मी शुक्ला यांनी भूमिका मांडल्यानंतर कोर्टाने हे दोन्ही गुन्हे रद्दबातल ठरवले होते. याशिवाय सायबर पोलीस ठाण्यात याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्हे प्रकरणातही सर्व कारवाई थांबवण्यात आली होती. त्यानंतर शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीवर आता विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.