तो एक काळा अध्याय होता, आर्यन खानला क्लीन चिट मिळाल्यानंतर शाहरुखचे वकील बोलले, मीडिया ट्रायलवरही केली टीका
हे याहीपूर्वी अनेकदा सांगितले होते आणि आताही त्याचाच पुनरुच्चार करत असल्याचे वकील मुकुल रोहतगी यांनी सांगितले आहे.
मुंबई – सुपरस्टार शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan case)याला क्रूझ ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यानंतर शाहरुखच्या चाहत्यांना विशेष आनंद झालेला आहे. सध्या सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा रंगली आहे. यातच शाहरुख खानच्या वकिलांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. शाहरुख खानचे वकील मुकुल रहतोगी (Mukul Rahtogi)यांनी आर्यन खान निर्दोष सुटल्याप्रकरणी आनंद व्यक्त केला आहे. तर आर्यन खानचे हे प्रकरण म्हणजे एक काळा अध्याय (Dark chapter)असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यासह त्यांनी त्याकाळी झालेल्या मीडिया ट्रायलवरही टीका केली आहे. सत्य नेहमीच समोर येते, हे याहीपूर्वी अनेकदा सांगितले होते आणि आताही त्याचाच पुनरुच्चार करत असल्याचे वकील मुकुल रोहतगी यांनी सांगितले आहे.
काय म्हणाले शाहरुख खानचे वकील
मुकुल रहोतगी म्हणाले की- मी यापूर्वीही सांगितले आहे की, या प्रकरणातील सत्य समोर आले आहे. या प्रकरणातील २६ दिवसांचा काळा अध्याय आता संपलेला आहे. आर्यन खानच्या विरोधात कोणताही पुरावा मिळालेला नाही. त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज सापडलेले नाही. त्यावेळी त्याला केलेली अटक ही विनाकारण होती, असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र या प्रकरणात एनसीबीने ही केस प्रोफेशनली हाताळली, याचा आनंद असल्याचे रोहतगी म्हणालेत. त्यांनी अटकेची चूक मान्य केली आणि आरोपपत्रात आर्यन खानला अटक करण्याची गरज नव्हती, हे मान्य केल्याचेही रोहतगींनी सांगितले आहे.
आर्यनच्या खटल्याचे ते दिवस म्हणजे काळा अध्याय
शाहरुख, त्याचे कुटुंबीय आणि आर्यन यांच्यासाठी तो काळ हा काळ्या अध्यायासारखा होता, असे मत रोहतगींनी मांडलेले आहे. मात्र आता तो काळा आध्याय संपला आहे, नवा दिवस उजाडला आहे. आर्यनसमोर चांगले भविष्य आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. आता हे प्रकरण इथेच संपवायला हवे, असेही मत त्यांनी मांडले आहे.
मीडिया ट्रायलवर टीकास्त्र
त्या काळात मीडिया ट्रायलवर त्यांनी टीका केली आहे. माध्यमांनी त्यांची लक्ष्मण रेषा पार करु नये, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. या प्रकरणाचा सुरुवातीचा तपास हा मुबंई एनसीबीकडून करण्यात येत होता. त्यानंतर हे प्रकरण दिल्ली एनसीबीच्या एसआयटीकडे सोपवण्यात आले. डीडीजी संजय सिंह यांनी या प्रकरणात गाभिर्याने चौकशी केली, त्यानंतर ते या निष्कर्षावर आल्याचे रोहतगींनी सांगितले आहे. आर्यन या प्रकरणात निर्दोष होता आणि त्याच्याकडे ड्रग्ज नव्हते हे तपासात स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.