भाजपसोबत जायचं का? शरद पवार-अजित पवार भेटीत काय ठरलं? जयंत पाटील म्हणाले…
अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा शरद पवार यांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्यासह त्यांच्या समर्थक 30 आमदारांनी आज शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
मुंबई | 17 जुलै 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. तीनही नेत्यांमध्ये आज 45 मिनिटं बैठक पार पडली. त्यानंतर अजित पवार यांच्या गटाच्या 30 आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली. या घडामोडी वाय. बी. चव्हाण सेंटर येथेच घडल्या. विशेष म्हणजे अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर 8 मंत्र्यांनी कालदेखील शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे या भेटीगाठीचा नेमका काय अर्थ काढायचा? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. या संभ्रवाच्या परिस्थितीत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली.
“विधानसभा आणि विधान परिषदेतील आमच्या पक्षाच्या काही आमदारांनी एकत्रितपणे अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनी एकत्रित येवून शरद पवार यांचे पदस्पर्श करुन दर्शन घेतलं. सर्वांनी शरद पवार यांना भेटून काल 9 मंत्र्यांना जी आग्रहाची विनंती केली होती तशीच विनंती आज भेट घेऊन सर्वांनी केली”, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
‘संवादातून काही चांगल्या गोष्टी होऊ शकतात’
“राजकारणात संवाद कधीच बंद करायचा नसतो. शेवटी संवादातून काही चांगल्या गोष्टी होऊ शकतात. संवाद चालू ठेवणं आवश्यक आहे. भेटीला येणाऱ्यांना सर्वांना शरद पवार भेटतात”, असं मोठं वक्तव्य जयंत पाटील यांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर केलं.
“वाय. बी. चव्हाण सेंटर इथे आलेल्या प्रत्येकाला शरद पवार भेटतात. तुम्ही सुद्धा भेटू शकता. तुम्हाला देखील अनुभव आहे. त्यामुळे आमच्या पक्षात येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करणं, त्याच्याशी बोलणं, चर्चा करणं सुरु असतं. शेवटी राजकारणात संवाद कधीही बंद करायचा नसतो. कुणी येवून बोलत असेल तर तो संवाद थांबवणं आवश्यक आहे, असं मला वाटत नाही. ते पुन्हा आले तर परत-परत बोलतील. त्याला काय?”, असं जयंत पाटील म्हणाले.
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विरोधी पक्षात आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात असलेले सर्व आमदार विरोधी पक्षातच बसलेले आहेत. आमच्यातील 9 सदस्यांनी सरकारमध्ये शपथ घेतली आहे हेही खरे आहे. पण राष्ट्रवादी पक्षाची सभागृहातील बैठक व्यवस्था बघितली तर सर्व विखुरलेले आणि विरोधी पक्षांच्या बाजूने बसलेले आहेत”, असं जयंत पाटील म्हणाले.
“शरद पवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. गेले अनेक दिवस ज्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वात काम केलं आहे, तीच लोकं पुन्हा येवून शरद पवारांना भेटत असतील तर त्यातून शरद पवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं कोणतंही कारण नाही”, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.
“सत्तेत सहभागी झालेली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या भेटीला आले. त्यांनी यातून मार्ग काढा, अशी विनंती केली. याबद्दल इतर कोणी अस्वस्थ होण्याची आवश्यकता नाही. शरद पवार हे देशातील अनुभवी नेते आहेत. त्यांच्याकडे जावून त्यांनी विनंती केली. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर मार्ग काढा, अशी त्यांची शरद पवार यांच्याकडे विनंती आहे”, असं पाटील म्हणाले.
“आपल्या घरात कुणी आलं तर त्यावर विश्लेषणात्मक टिप्पणी करणं योग्य नाही. शरद पवार यांना ते सगळे भेटायला आले होते. ते नाराज होते का, यावर भाष्य करणे योग्य नाही, असं मला वाटतं”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. दरम्यान, महाविकास आघाडीच्या आमदारांकडून आज विधान भवनाच्या पायऱ्यांविरोधात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात राष्ट्रवादीचा एकही आमदार नव्हते. यावरही जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
“सर्व आमदार साडेदहापर्यंत आले. त्यांच्याबरोबर विचार विनिमय करताना आमच्याही लक्षात आलं नाही की खाली आंदोलन सुरु झालं आहे. ज्यावेळी लक्षात आलं तेव्हा आम्ही खाली आलो, त्यावेळी नाना पटोले, अंबादास दानवे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करत होते. त्यावेळी मी सुद्धा त्यांच्यासोबत जावून पुतळ्याला हार अर्पण केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विरोधीपक्षा बरोबर आहे”, अशी भूमिका जयंत पाटील यांनी मांडली.