BREAKING | संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांची मोठी कारवाई
खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. कांजूरमार्ग पोलिसांनी या प्रकरणी 5 आरोपींना अटक केली आहे. त्यानंतर संजय राऊत यांच्यावर विरोधकांकडून अनेक आरोप केले जात आहेत. त्यामुळे या प्रकरणात आगामी काळात काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई : खासदार संजय राऊत आणि त्यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांच्या धमकी प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांना अटक केली आहे. यापैकी तिघांना गोवंडीतून अटक करण्यात आलीय. तर दोघांना ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. रिझवान अन्सारी, शाहिद अन्सारी, आकाश पटेल, मुन्ना शेख आणि मयूर शिंदे अशी 5 अटकेतील आरोपींची नावे आहेत. मुंबईच्या कांजूरमार्ग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. कांजरमार्ग पोलिसांकडून या प्रकणी अधिक तपास सुरु आहे. या प्रकरणातील आरोपी अजहर मोहम्मद शेख आणि मयूर शिंदे या दोन्ही आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने या दोन्ही आरोपींना 19 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
विशेष म्हणजे अटकेतील आरोपींपैकी मयूर शिंदे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक केसेस दाखल आहेत, अशी माहिती संजय राऊतांच्या वकिलांनी कोर्टात दिली आहे. दुसरीकडे मयूर शिंदे गेल्या सात ते आठ वर्षांपासून सामाजिक कामांमध्ये सक्रिय असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केलाय.
नेमकं प्रकरण काय?
संजय राऊत यांना गोळी घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आली. काही अज्ञातांनी फोन करुन ही धमकी दिली. फक्त संजय राऊतच नाहीत तर त्यांचे भाऊ सुनील राऊत यांनाही याबाबतची धमकी देण्यात आली, असा दावा संजय राऊत यांनी केलाय. “महाराष्ट्रातील सरकारविरोधात बोलणं बंद करा. नाहीतर गोळ्या घालून ठार मारु”, अशी धमकी संजय राऊतांना देण्यात आली.
धमक्यांबाबत तक्रार करुनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप संजय राऊतांनी केलाय. संजय राऊत यांनी धमक्यांबाबतचे रेकॉर्डिंग मुंबई पोलीस आयुक्तांकडे पाठवले आहेत. त्यानंतर आता या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपी मयूर शिंदे कोण आहे?
मयूर शिंदेच्या फेसबूकवर सर्वपक्षीय नेत्यांचे फोटो आहेत. मयूर शिंदे याची याआधी राऊत कुटुंबाशी आधी जवळीक असल्याचीदेखील माहिती मिळत आहे. राऊतांना धमकी देणाऱ्यांच्या संपर्कात मयूर असल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. धमकी देणार आणि मयूर शिंदे या दोघांचा एकमेकांशी असलेला संबंध पोलीस तपासणार आहेत.
संदीप देशपांडे यांचा राऊतांवर गंभीर आरोप
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत धमकी प्रकरणात उडी घेतली आहे. संजय राऊतांनी आपल्या जवळच्याच कार्यकर्त्यांना सांगून धमकीचा बनाव रचल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. तसेच त्यांनी संजय राऊतांना नाटकात काम करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.