कविवर्य नारायण सुर्वे यांच्या घरी चोरीनंतर चोराची भावनिक चिठ्ठी… नाहीतर मी चोरी केली नसती…
narayan surve: कविवर्य नारायण सुर्वे यांनी आपले शब्द, साहित्य शोषित वंचित घटकांसाठी खर्च केले. त्यांचे नेरळमध्ये घर आहे. त्या घरात त्यांची मुलगी सुजाता घारे आणि जावाई गणेश घारे राहतात. ते दहा दिवसांसाठी विरारला मुलाकडे गेले होते. यामुळे त्यांच्या घराला कुलूप होते.
‘भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली…’, असे सांगत शोषित, कष्टकरी लोकांच्या वेदना आपल्या कवितेतून मांडणाऱ्या कविवर्य नारायण सर्वे यांच्या घरी चोरी झाली. परंतु हे घर कविवर्य नारायण सुर्वे यांचे असल्याचे चोराला समजल्यावर त्याला पश्चात्ताप झाला. त्याने भावनिक चिठ्ठी लिहून कविवर्य नारायण सुर्वे यांच्या कुटुंबियांची माफी मागितली. इतकेच नाही तर त्याने चोरलेल्या वस्तू परत आणून दिल्या. कविवर्यांची भुरळ शोषित अन् कष्टकरी प्रत्येकांच्या मनात असल्याचे यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
मुलगी जावाई विरारला गेले अन् चोरी
कविवर्य नारायण सुर्वे यांनी आपले शब्द, साहित्य शोषित वंचित घटकांसाठी खर्च केले. त्यांचे नेरळमध्ये घर आहे. त्या घरात त्यांची मुलगी सुजाता घारे आणि जावाई गणेश घारे राहतात. ते दहा दिवसांसाठी विरारला मुलाकडे गेले होते. यामुळे त्यांच्या घराला कुलूप होते. ही संधी साधून चोराने त्यांच्या घरावर डल्ला मारला. शौचालयाची खिडकी फोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर सलग दोन, तीन दिवस मिळेल ते सामान घेऊन चोर जाऊ लागला. चोराने एलईडी टीव्ही, तांब्या-पितळ्याच्या वस्तू, भांडी आदी साहित्य नेले.
अन् चोराला बसला धक्का
घरात कोणीच नसल्याने चोर रोज येऊ लागला. एका खोलीत त्याला भिंतीवर नारायण सुर्वे यांचा फोटो दिसला. तसेच कविवर्यांना मिळालेले पुरस्कार, स्मृतिचिन्हे, मानपत्रे दिसले. मग हे घर कविवर्य नारायण सुर्वे यांचे असल्याचे त्याला समजल्यावर धक्का बसला. त्याला आपण केलेल्या कृतीचा पश्चात्ताप झाला. त्याच्यातील माणूस जागा झाला. त्याने चोरून नेलेल्या एक, एक वस्तू परत आणून देण्यास सुरुवात केली. टीव्हीसह सर्वच वस्तू आणून ठेवल्या. त्यानंतर आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली.
चिठ्ठीतून दिसला चोरामधील माणूस
कविवर्य नारायण सुर्वे यांच्या घरी चोरी करणाऱ्या त्या अनामिक चोराने चिठ्ठी लिहिली. या चिठ्ठीतून मोजक्या शब्दांत आपल्या भावना मांडल्या. मला माहीत नव्हते की, हे घर नारायण सुर्वे यांचे आहे. नाही तर मी चोरी केली नसती. मला माफ करा. मी, तुमच्या ज्या वस्तू घेतल्या आहेत, त्या परत करत आहेत. मी टीव्ही पण नेला होतो. तो परत आणला. सॉरी…
चोराने या चिठ्ठीतून आपल्यामधील माणूस जिवंत असल्याचे दाखवून दिले. या घटनेत चोरीपेक्षा चोराने केलेल्या कृतीची चर्चा होत आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चोराने परत आणलेल्या टीव्हीचे फिंगर प्रिंट तपासण्यासाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले आहे. त्या आधारे तपास सुरू केला आहे.