लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाण्याआधी ‘हा’ व्हिडीओ नक्की बघा
तुम्ही मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जात असाल तर आधी हा व्हिडीओ नक्की बघा. लालबागच्या राजाची नवसाला पावणारा लालबागचा राजा अशी ख्याती आहे. त्यामुळे लाखो भाविक इथे दर्शनाला येतात. पण या भाविकांच्या गर्दीवर नियोजन करण्यात प्रशासन कमी पडत आहे.
मुंबई | 21 सप्टेंबर 2023 : मुंबई प्रभादेवी (एलफिस्टन्स) रेल्वे स्थानकावर घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेने काहीच शिकलेली नाही का? असा प्रश्न उपस्थित होतोय. हा प्रश्न उपस्थित होण्यामागील कारणही अगदी तसंच आहे. आपण मुंबईला स्वप्नांचं शहर म्हणतो. या मुंबईने आपल्याला स्वप्न पाहायला शिकवलं, मेहनत करायला शिकवलं. पण याच मुंबईने स्वत:ची जीवाची पर्वा न करता काम करण्याची सवय लावली. पण हीच सवय आता नको तिथे देखील बघायला मिळत आहे. मुंबईच्या लालबाग परिसरातला एक चित्त थरारक असा व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओतली गर्दी पाहिली तर अंगावर काटे उभे राहतील. त्यामुळे या वस्तुस्थिकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे.
राज्यात सध्या गणेशोत्सवाचा उत्साह आहे. मुंबईतही गणेसोत्सवाचा आनंद आहे. मुंबईत प्रसिद्ध असलेल्या नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भाविकांची गर्दी बघायला मिळत आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनाला सेलिब्रेटींबापासून वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती जातात. त्यामुळे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सर्वसामान्य भक्तांची देखील अफाट गर्दी होते. पण या गर्दीचं नियोजन करण्यात प्रशासन खूप कमी पडताना दिसत आहे.
व्हिडीओत नेमकं काय आहे?
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या गर्दीचा एक व्हिडीओ सोसल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत गर्दी इतकी जास्त झालेली बघायला मिळतेय की चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होते. गर्दीतली माणसं इकडून तिकडे आणि तिकडून इतके अशी धक्काबुक्की करताना दिसत आहेत.
विशेष म्हणजे या गर्दीला आवरण्यासाठी पोलीस दिसत नाहीयत. त्यामुळे पोलीस नेमके गेले कुठे? ते गर्दी आवरायला का नाहीत? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संबंधित व्हिडीओची दखल आता तरी मुंबई पोलिसांकडून घेतली जाईल का? असा प्रश्नही उपस्थित होतोय.
भाविकांची रेल्वे विभागाकडूनही गैरसोय
दरम्यान, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबई उपनगरातून लाखो भाविक जात आहेत. या भाविकांची रेल्वे विभागाकडून सुद्धा प्रचंड गैरसोय होत आहे. मध्य रेल्वे मार्गावरील लोकल गाड्या दररोज उशिराने धावत आहेत. त्यामुळे रोज ऑफिससाठी ये-जा करणारे कर्मचारी आणि भाविक दोघांना याचा फटका बसत आहे.