लालबागच्या दरबारात भाविकांना मारहाण, पोलीस आयुक्तांकडे तक्रार, पाहा धक्कादायक VIDEO
लालबागच्या राजाच्या मंडपात प्रचंड गर्दी होत आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलेल्या भाविकांची तुम्ही आतापर्यंत भरगच्च गर्दीची दृश्यं तुम्ही पाहिली असतील. पण आता फ्री स्टाईल हाणामारीपर्यंत प्रकरण आलंय.
मुंबई | 22 सप्टेंबर 2023 : दर्शनासाठी रांगेतून पुढं येणाऱ्या भाविकांना लालबागच्याच पदाधिकाऱ्याकडून मारहाण झालीय. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत नीट बघितलं तर, दर्शनासाठी रांगेत थांबलेल्या भाविकांना सोडताच, एक-एक भाविक पुढे जातोय. त्यावेळी चेक्सचा शर्ट घालेलला मंडळाचा पदाधिकारी येतो आणि थेट भाविकांना मारहाण करतो. हा पदाधिकारी भाविकांना मारत सुटला. रांगेत महिला आहेत, पुरुष आहेत. कडेवर लहान मुलं आहेत, पण काहीच पर्वा नाही.
भाविकांना रोखण्यासाठी या पदाधिकाऱ्यानं भाविकांवर थेट हात उगारलाय. त्यानंतर एका पाठोपाठ एक भाविक येत असल्यानं काही क्षण हा मारकुट्या पदाधिकारी बाजूला झाला. पण नंतर पुन्हा अंगात भूत संचारल्याप्रमाणं तो मारण्याचा धाक दाखवतोय आणि गर्दी रोखण्याचा प्रयत्न करतोय. विशेष म्हणजे हा मारहाण करतोय, तिथून काही पावलांवरच 2 पोलीस दिसतायत. मात्र तेही बघ्याच्याच भूमिकेत दिसतायत.
नियोजनाचा प्रचंड अभाव
विशेष म्हणजे एक दिवसाआधीच, धक्काबुक्कीचा व्हिडीओ समोर आला होता, आणि आता पदाधिकारीच कसे मारहाण करतात हे कॅमेऱ्यात कैद झालंय. म्हणजेच नियोजनाचा अभाव स्पष्ट दिसतोय, आणि पोलीस कुठं आहेत? हाही सवाल आहेच.
पोलीस आयुक्तांकडे तक्रार
लालबागच्या दरबारात ज्या पद्धतीची वागणूक राजाच्या भाविकांना मिळतेय, त्यावरुन आशिष राय आणि पंकज कुमार मिश्रा या 2 वकिलांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना तक्रार दिलीय. लालबागच्या दरबारात काही विपरित घटना घडली तर त्याच लालबागच्या राजाचं मंडळ, स्थानिक पोलीस आणि महाराष्ट्र शासन जबाबदार असेल असं लेखी तक्रारीत म्हटलंय.
लालबागच्या राजाच्या दर्शनाला फक्त मुंबईच नाही तर, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देशभरातून भाविक इथं येतात. लाडक्या गणपती बाप्पाची झलक पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी तासंतास रांगेत लागतात. मात्र असे रोज नव नवे व्हिडीओ समोर येत आहेत. जबर धक्काबुक्की होतेय. तर कुठं गर्दी आवरणं कठीण होतंय.
अर्थातच नियोजनाचा अभाव स्पष्ट दिसतोय. त्यामुळं मुंबई पोलिसांनी आणि विशेषत: गृहखात्यानं याकडे गंभीरतेनं बघणं आवश्यक आहे. कारण दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तर काही रोखता येणार नाही. पण नियोजनाद्वारे दर्शन कसं मिळेल, यावर विचार व्हायला हवा.