Mumbai Dangerous Bldg List : मुंबई महापालिका क्षेत्रातील सी-1 श्रेणीतील अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर
महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महानगरातील निवासी व अनिवासी इमारतींचे सर्वेक्षण नुकतेच करण्यात आले. तपासणीअंती रविवारी (25 एप्रिल 2022) अंतिम केलेली सी-1 श्रेणीतील अतिधोकादायक आणि मोडकळीस आलेल्या इमारतींची यादी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सी-1 श्रेणीतील अतिधोकादायक (Dangerous) व मोडकळीस आलेल्या इमारतींची यादी (List) महापालिकेकडून जाहीर करण्यात आली आहे. एकूण 337 इमारतींचा धोकादायक इमारतींमध्ये समावेश आहे. इमारतींची यादी महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.mcgm.gov.in यावर उपलब्ध आहे. या 337 इमारतींपैकी मुंबई शहर विभागात 70, पूर्व उपनगरे विभागात 104 तर पश्चिम उपनगरे विभागात 163 इमारतींचा यादीत समावेश आहे. धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्वरित सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार आणि उप आयुक्त (अतिक्रमण निर्मूलन) चंदा जाधव यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे. (List of C-1 class most dangerous buildings in Mumbai Municipal Corporation area announced)
मुंबईतील निवासी व अनिवासी इमारतींचे नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले
महापालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळापूर्व विविध कामे आणि उपाययोजना केल्या जातात. नाल्यांमधून गाळ काढणे, रस्ते दुरुस्ती यासोबतच मुंबई महानगरातील निवासी घरांची आणि अनिवासी जागांची तपासणी करुन त्यांची धोकादायक आणि अतिधोकादायक श्रेणी निश्चित केली जाते. यंदा देखील महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महानगरातील निवासी व अनिवासी इमारतींचे सर्वेक्षण नुकतेच करण्यात आले. तपासणीअंती रविवारी (25 एप्रिल 2022) अंतिम केलेली सी-1 श्रेणीतील अतिधोकादायक आणि मोडकळीस आलेल्या इमारतींची यादी जाहीर करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर ‘इतर संकेतस्थळं / Relevant Websites’ या सदरामध्ये ही यादी नागरिकांसाठी उपलब्ध आहे.
मुंबई शहर विभागात 70 इमारती धोकादायक
मुंबई शहर विभागात 70 इमारती अतिधोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत. या 70 इमारतींमध्ये ए विभाग 4, बी विभाग 4, सी विभाग 1, डी विभाग 4, ई विभाग 12, एफ/दक्षिण विभाग 5, एफ/उत्तर विभाग 26, जी/दक्षिण विभाग 4 आणि जी/उत्तर विभाग 10 अशा विभागनिहाय इमारतींचा समावेश आहे.
पश्चिम उपनगरामध्ये 163 इमारती धोकादायक
पश्चिम उपनगरमध्ये 163 इमारती धोकादायक ठरवण्यात आल्या आहेत. 163 पैकी एच/पूर्व विभागात 9, एच/पश्चिममध्ये 30, के/पूर्व विभागात 28, के/पश्चिम विभागात 40, पी/दक्षिण विभागामध्ये 3, पी/उत्तर विभागात 13, आर/दक्षिण विभागात 10, आर/मध्य विभागामध्ये 22 आणि आर/उत्तर विभागात 8 इमारती सी-1 श्रेणीमध्ये समाविष्ट आहेत.
पूर्व उपनगरात 104 इमारती धोकादायक
पूर्व उपनगरातील 104 इमारती इमारतींपैकी एम/पश्चिम विभागात 16, एम/पूर्व विभागामध्ये 1, एल विभागात 12, एन विभागात 20, एस विभागात 6 आणि टी विभागात 49 इमारतींचा समावेश आहे.
या अतिधोकादायक व मोडकळीस आलेल्या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांनी त्वरित निवासस्थान रिक्त करावे, तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे तसेच सदर इमारत स्वतःहून मालकांनी निष्कासित करावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. अतिधोकादायक इमारतींबाबत अधिक माहितीसाठी महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या 1916 / 22694725 / 22694727 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. कोणत्याही प्रकारची हानी टाळण्याच्या दृष्टीने जागरुक राहणे, ही नागरिकांची देखील जबाबदारी असून त्या कामी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. (List of C-1 class most dangerous buildings in Mumbai Municipal Corporation area announced)
इतर बातम्या