महाविकास आघाडीत पुन्हा खलबते, लोकसभेची रणनीती ठरवणार
maha vikas aghadi | बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात महायुतीला रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र लोकसभा निवडणूक लढणार आहे. त्यासाठी जागावाटप करण्यात येणार आहे.
मुंबई, दि.30 जानेवारी 2024 | देशात आता लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. ही निवडणूक एनडीए आघाडी विरुद्ध इंडिया आघाडी अशी होणार असल्याची चिन्ह आहेत. त्यापूर्वी इंडिया आघाडीला धक्का बसला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी इंडिया आघाडीची साथ सोडत एनडीएमध्ये प्रवेश केला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आज महाविकास आघाडीने बैठक बोलवली आहे. दुपारी २ वाजता नरिमन पॉईंट येथील ट्रायडेन्ट हॉटेलमध्ये ही बैठक होणार आहे.
बैठकीला कोणाची उपस्थिती
महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी शिवसेना उबाठा पक्षाकडून खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत उपस्थिती राहणार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गटाचे) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थितीत राहणार आहेत. काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड उपस्थितीत राहणार असल्याची शक्यता आहे.
बैठकीचा अजेंडा काय
बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात महायुतीला रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र लोकसभा निवडणूक लढणार आहे. त्यासाठी जागावाटप करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावर चर्चा होणार आहे. बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रकाश आंबेडकर येणार नाही. परंतु त्यांचे प्रतिनिधी म्हणून धैर्यवर्धन पुंडकर उपस्थितीत राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राजू शेट्टी यांना सोबत घेण्याचा प्रयत्न
महाविकास आघाडीची यापूर्वी २५ जानेवारी रोजी बैठक झाली होती. यावेळी सीपीआय आणि सीपीएम नेत्यांशी चर्चा झाली होती. प्राथमिक जागावाटप त्यावेळी निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. बैठकीनंतर बोलताना संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडी आमच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे आजच्या बैठकीत वंचित आघाडीला बोलवण्यात आले आहे. तसेच राजू शेट्टी यांच्याशी चर्चा केली जात आहे. महाविकास आघाडीने महायुतीविरोधात छोट्या पक्षांनाही सोबत घेण्याचे धोरण ठरवल्याचे दिसत आहे.