Rahul Narvekar | दिल्लीत नव्या संसद भवनानंतर आता महाराष्ट्रात नवं विधान भवन बनणार? विधानसभा अध्यक्षांचं मोठं वक्तव्य
दिल्लीत नवं संसद भवन उभं राहिलं आहे. संसद भवन हे देशाचं सर्वोच्च सभागृह मानलं जातं. तसेच राज्यात विधान भवन हे सर्वोच्च सभागृह मानलं जातं. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज नवं विधान भवन तयार करण्याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
ब्रिजभान जैसवार, Tv9 मराठी, मुंबई | 19 ऑक्टोबर 2023 : देशाची राजधानी दिल्लीत नव्या संसद भवनाचं नुकतंच उद्घाटन झालंय. त्यानंतर आता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा देखील महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत नवं विधान भवन उभारण्याचा विचार आहे की काय? असा प्रश्न निर्माण झालाय. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज याबाबत एका कार्यक्रमात मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राज्यात आगामी काळात आणखी मोठी विधान भवनाची वास्तू साकारली जाण्याची शक्यता आहे. मुंबईतील सर जे.जे. कला महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात राहुल नार्वेकर बोलत होते. यावेळी त्यांनी याबाबतचं वक्तव्य केलं. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च-तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित होते.
“जे जे स्कुल ऑफ आर्ट्स हे महाविद्यालय माझ्या मतदारसंघात येतं. दक्षिण मुंबईच्या ह्या क्षेत्रात कलेचा एक वेगळाच अनुभव प्राप्त होतो. जे जे स्कुल ऑफ आर्ट्स, जहांगीर आर्ट गॅलरी, एनसीपीए असे अनेक संस्थान या क्षेत्रात कला संबंधित आहेत. जे जे स्कुल ऑफ आर्ट्स सारख्या संस्थांना प्रोत्साहन देणे अत्यंत गरजेचं आहे”, असं राहुल नार्वेकर म्हणाले.
राहुल नार्वेकर यांचं मोठं वक्तव्य काय?
जे जे स्कूलच्या कार्यक्रमात राहुल नार्वेकर यांनी विधानसभा आणि विधान परिषद वास्तू बनविण्याचा उल्लेख केला. “आम्ही विधान परिषद आणि विधान सभेसाठी एक नवीन वास्तू बनविण्याचा विचार करत आहोत. आणि त्यामुळे आम्ही तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येऊ”, असं मोठं वक्तव्य राहुल नार्वेकर यांनी यावेळी केलं.
‘जे जे स्कुलला डीम्ड करण्याचा प्रस्तवाला केंद्र सरकारची मंजुरी’
यावेळी देवेंद्र फडणीस यांनीदेखील भाषण केलं. “आज खरोखरच अतिशय आनंदाचा दिवस आहे. जे जे स्कुल ऑफ आर्ट्सला डीम्ड विद्यापीठचा दर्जा देण्यासाठी सवतः केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आले आहेत. त्यांचं मी आभार मानतो. भारताचा स्वतंत्र्याचा 1857 चा काळ आम्ही विसरू शकत नाहीत. त्याच काळातली जे जे स्कुल ऑफ आर्ट्सची स्थापना आपण विसरू शकत नाही. मुंबईच्या सौंदर्यात जेजे स्कुल ऑफ आर्ट्सचा एक मोठा वाटा आहे. हा एक मोठा इतिहास आहे. त्याला काळानुरूप नवीन स्वरूप देणे हे देखील महत्वाचं आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“एखादी संस्था मोठी करायची असेल तर बंधनात ठेऊन करता येणार नाही, म्हणून मला आज आनंद आहे की भारत सरकारने आपल्या शिक्षा नीतीमध्ये बदल करून जे जे स्कुलला डीम्ड करण्याचा प्रस्तवाला केंद्र सरकारने मंजूर केला. मानवीय जीवनात सकारात्मक बदल घडविणाऱ्या संस्था विकसित झाल्या पाहिजेत. हे चंद्रकांत पाटील यांनी लक्ष दिलं त्यासाठी त्यांचा मी आभारी आहे”, असं फडणवीस म्हणाले.
धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून मोठी घोषणा
मुंबईतील सर जे. जे. कला महाविद्यालय, उपयोजित कला महाविद्यालय आणि वास्तुशास्त्र महाविद्यालय या तीन कॉलेजांचे मिळून आता डी-नोव्हो प्रकारातंर्गत अभिमत विद्यापीठ (Deemed university ) स्थापनेची अधिकृत घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट कार्यक्रमात आले. यावेळी त्यांनी याबाबतची घोषणा केली.