भाजप नेत्यांचा एक फोटो; ज्याची महाराष्ट्रात चर्चा!
भाजपचे महाराष्ट्रातील तीन महत्त्वाच्या नेत्यांनी दिल्लीत जाऊन पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. या बैठकीला एकूण आठ नेते उपस्थित होते. (Maharashtra BJP leaders meet JP Nadda to review poll)
मुंबई: भाजपचे महाराष्ट्रातील तीन महत्त्वाच्या नेत्यांनी दिल्लीत जाऊन पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. या बैठकीला एकूण आठ नेते उपस्थित होते. सुमारे तासभर या नेत्यांमध्ये चर्चा झाली. कधी गंभीरपणे तर कधी हास्य विनोद करत यावेळी मनमोकळ्या गप्पा झाल्या. राज्यातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतानाच मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानेही या बैठकीत चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. दिल्लीतील बैठकीचे हे फोटो व्हायरल झाल्याने त्यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. (Maharashtra BJP leaders meet JP Nadda to review poll)
काल शुक्रवार 8 जानेवारी रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ भाजप नेते सुधीर मुनगंटीवार हे काल दिल्लीला गेले होते. पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांनी बोलावल्यामुळे हे तिन्ही नेते दिल्लीत दाखल झाले. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष, शिवप्रकाश, व्ही, सतीश आणि विजय पुराणिक आदी नेते उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्रातील संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला.
पहिला फोटो: गंभीर चर्चा
या बैठकीचे तीन फोटो व्हायरल झाले आहेत. पहिल्या फोटोत सर्वच नेते गंभीरपणे मंथन करताना दिसत आहे. महाविकास आघाडीच्या सरकारला झालेलं एक वर्षे, विधानपरिषद निवडणुकीतील अपयश आणि महाविकास आघाडीवरील जनतेचा वाढता विश्वास या अनुषंगाने चर्चा सुरू असल्याचं पहिल्या फोटोतील सर्वच नेत्यांच्या देहबोलीतून जाणवत आहे. या फोटोत चंद्रकांत पाटील काही तरी सांगताना दिसत आहेत. त्यावर मुनगंटीवारही बोलण्याच्या पावित्र्यात असल्याचं दिसतंय. तर फडणवीस यांनी हाताची घडी घालून ऐकण्याची भूमिका घेतलेली दिसतेय. जेपी नड्डा आणि इतर नेतेही ऐकण्याच्याच भूमिकेत असल्याचं दिसत आहे. पाटील यांच्याबाजूला बसलेल्या एका नेत्याच्या हातात कसली तरी चिठ्ठी असून त्यावरून ते नजर फिरवताना दिसत आहेत.
दुसरा फोटो: खेळीमेळीचं वातावरण
दुसऱ्या फोटोतील वातावरम काहीसं हलकं फुलकं झालेलं दिसतंय. या फोटोत नड्डा काही तरी सांगताना दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य असून फडणवीस, बी. एल. संतोष आणि विजय पुराणिक हे नेते सुद्धा हसताना दिसत आहेत. नड्डा या केंद्रीय नेत्यांकडे बघून हसताना दिसत असून फडणवीस हे पाटील यांच्याकडे बघून हसत असल्याचं या फोटोतून दिसतं. नड्डा यांच्या एखाद्या कोपरखळीवर सर्वच नेते हसत असावेत असा अंदाज या फोटोतून येतो.
तिसरा फोटो: हास्य विनोद
तिसऱ्या फोटोत तर केवळ तीनच नेते दिसत आहेत. जेपी नड्डा आणि भाजपचे इतर दोन केंद्रीय नेते आहेत. या फोटोत तिघेही नेते खळखळून हसताना दिसत आहेत. जेपी नड्डा यांनी मार्गदर्शन करत असताना काही तरी विनोद केला असावा, त्यामुळे तिघांच्याही चेहऱ्यावर हास्य उमटलेलं दिसत आहे. त्यावरून या बैठकीत गंभीर विषयावर चर्चा झालीच, पण खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक पार पडल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.
दिल्लीतच बैठक का?
जेपी नड्डा या पूर्वीच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार होते. त्यांच्या तारखाही फिक्स झाल्या होत्या. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने ते मुंबईत येणार होते. परंतु, त्यांना कोरोना झाल्याने ही बैठक पुढे ढकलली. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी गेले असता त्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला. त्यामुळे नड्डा यांचा महाराष्ट्रातील नियोजीत दौरा रद्द झाला. आगामी काळातील त्यांचं शेड्यूल अत्यंत व्यस्त असल्याने ते मुंबईत येऊ शकणार नाहीत. त्यामुळे त्यांनी पाटील, फडणवीस आणि मुनगंटीवार यांना दिल्लीत बोलावून घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. (Maharashtra BJP leaders meet JP Nadda to review poll)
काय चर्चा झाली?
या बैठकीत मुंबई आणि महाराष्ट्रातील संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यात आल्याचं कालच चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. त्याशिवाय विधानपरिषदेतील पराभवाची कारणंही नड्ड यांनी जाणून घेतली. ग्रामपंचायत निवडणुकांसाठीची तयारी, महाराष्ट्रातील आगामी पाच महापालिका निवडणुका आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने होत असलेल्या तयारीचा आढावाही घेण्यात आला. तसेच कृषी कायद्यांबाबत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची असलेली भूमिका, या कायद्याच्या समर्थनासाठी केलेल्या कार्यक्रमांची माहितीही घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. (Maharashtra BJP leaders meet JP Nadda to review poll)
Our @BJP4India National President @JPNadda ji took organisational review with @BJP4Maharashtra leaders in NewDelhi. Attended the meeting with National General Secretary(org) @blsanthosh ji, @shivprakashbjp ji, @v_shrivsatish ji, @ChDadaPatil, @SMungantiwar bhau & Vijay Puranik ji pic.twitter.com/e69bDdXfaf
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 8, 2021
संबंधित बातम्या:
फडणवीसांसह महाराष्ट्रातील 3 नेते दिल्लीत, जेपी नड्डांशी खलबतं, कारण काय?
भाजपचं दोन दिवस मॅरेथॉन मंथन, कोअर कमिटीचे बडे नेते हजर, विनोद तावडेंना स्थान नाही
जेव्हा शाह-फडणवीसांनी आमीष दाखवूनही विलासकाकांनी भाजपला नकार दिला…
(Maharashtra BJP leaders meet JP Nadda to review poll)