मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गिरणी कामगारांसाठी सर्वात मोठी घोषणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरणी कामगारांसाठी मोठी आणि महत्त्वाची घोषणा केलीय. मुख्यमंत्र्यांची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत गिरणी कामागारांच्या मागणीवर चर्चा झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी गिरणी कामगारांसाठी मोठी घोषणा केली.
मुंबई | 21 ऑगस्ट 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज गिरीणी कामगारांसाठी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यामांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी गिरीणी कामगारांसाठी मोठी घोषणा केली. महाराष्ट्र सरकार लवकरच गिरणी कामगारांसाठी 500 घरांची सोडत काढणार, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. यावेळी त्यांनी गिरणी कामगारांच्या मागणीकडे आपण गांभीर्याने पाहत असल्याचं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. विशेष म्हणजे त्यांनी गिरणी कामगारांसाठी फक्त मुंबईतच नाही तर त्यांना त्यांच्या गावाजवळ, तालुक्याजवळही घर घेता येईल, अशी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
“अनेक गिरणी कामगार घरापासून वंचित राहिले ही वस्तुस्थिती आहे. मुंबईच्या जडणघडणीत गिरणी कामगारांचा वाटा सिंहाचा आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे राज्य सरकारने अतिशय गांभीर्याने गिरीणी कामगारांना घरं देण्याचा निर्णय घेण्याबाबतचं ठरवलं आहे. त्याप्रमाणे आज बैठक झाली. मुंबई एमएमआरमध्ये हाऊसिंग स्टाफ वाढवणं, किंवा मुंबईच्या बाहेर जे गिरणी कामगार त्यांच्या गावाजवळ, गावाजवळील शहरात किंवा तालुक्याजवळ घर घेऊ इच्छित आहेत ते इच्छिक आपण ठेवलेलं आहे”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
1 लाख 74 अर्ज आले, मुख्यमंत्र्यांची माहिती
“मुंबई एमएमआरमध्ये देखील कल्याण, कोनगाव, ठाण्याच्या जवळ अनेक ठिकाणी ज्या जागा आहेत त्या ठिकाणी गिरणी कामगारांसाठी घरं बघणं आणि हाऊसिंग स्टॉक जास्तीचा तयार करणं यावर चर्चा झाली. याशिवाय मुंबईत जे प्रकल्प आहेत ते मार्गी लावणं, याबाबतीत देखील संबंधित यंत्रणांना सूचना दिलेल्या आहेत. एनटीसी मिलच्या विकासाच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेऊन त्या जागांवर देखील मोठ्या प्रमाणावर गिरणी कामगारांना घरे कसे देता येतील, याबाबत सरकार पूर्णपणे प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर जे 1 लाख 74 अर्ज आले आहेत, यापैकी पात्र आणि अपात्र याबाबत तीन महिन्यात निर्णय घेण्याची सूचना प्रशासनाला दिली आहे”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
‘5 हजार घरांची लॉटरी ताबोडतोब काढता येतील’
“काही घरे आहेत, पनवेल आणि कल्याणमधील घरांच्या डागडुजी युद्ध पातळीवर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. जवळपास 5 हजार घरांची लॉटरी आपल्याला ताबोडतोब काढता येतील अशा प्रकारचंदेखील आजच्या बैठकीत ठरलं. जेणेकरुन गिरीणी कामगारांची घराची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे ती पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची होती”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
“आपलं सरकार आल्यानंतर आपण तीन-चार वेळेला लॉटरी काढली होती. आपण जवळपास 1000 घरं देण्याचा निर्णय घेतला तसेच आपण घरे दिलीदेखील आहेत. सरकारची एक प्रामाणिक भावना आणि भूमिका आहे, जे गिरणी कामगार गेले अनेक वर्षापासून घरापासून वंचित आहेत, त्यांना मोठ्या प्रमाणावर हाऊसिंग स्टॉक तयार करुन आपल्या संबंधित विभागांवर चर्चा झाली”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.