Anil Deshmukh : 2 महिने गायब, सकाळी ED कार्यालयात, 13 तास चौकशी, रात्री 12 वाजता अटक, ईडीने कशी कारवाई केली?
Anil Deshmukh Arrest : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर ईडीने अटक केलीय. 100 कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणात त्यांना ईडीने रात्री 12 वाजता अटक केलीय. गेले अनेक दिवस ते फरार होते.
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर ईडीने अटक केलीय. 100 कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणात त्यांना ईडीने रात्री 12 वाजता अटक केलीय. गेले अनेक दिवस ते फरार होते. ईडीने अनेक वेळा समन्स दिल्यानंतरही ते ईडी कार्यालयात हजर राहत नव्हते. परंतु काल सकाळी साडे दहा-अकराच्या सुमारास ते अचानक ईडी कार्यालयात हजर झाले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी 13 तास त्यांची मॅरेथॉन चौकशी केली. अखेर मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास देशमुख यांना अटक करण्यात आली.
अनिल देशमुख चौकशीला सहकार्य करत नाही, 12 वाजता अटकेची कारवाई
अनिल देशमुख सोमवारी सकाळी 11.30 ते 11.45 वाजताच्या दरम्यान ते ईडी कार्यालयात हजर झाले. त्यानंतर रात्री 12 पर्यंत त्यांची चौकशी झाली. म्हणजेच 13 तास मॅरेथॉन चौकशी झाली. या चौकशीदरम्यान ते ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत नव्हते. ईडीचे अधिकारी त्यांना विविध विषयांवर बोलतं करण्याच्या प्रयत्न करत होते. मात्र देशमुख काहीतरी लपवू पाहत होते. अनेक प्रयत्नांतरही देशमुख उत्तरं द्यायला, माहिती द्यायला टाळाटाळ करत होते. अखेर रात्री 12 वाजता ईडीने देशमुख यांना अटक करण्याचा निर्णय घेतला.
ईडीकडून झालेली अटक चुकीची, आम्ही न्यायालयात जाणार, देशमुखांच्या वकिलाची प्रतिक्रिया
अनिल देशमुख यांच्यावर सेक्शन 19 पीएमएलए अंतर्गत कारवाई करण्यात आलीय. आज सकाळी 11 च्या आसपास त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. ईडी अनिल देशमुख यांच्यासाठी पोलिस कोठडी मागेल तर ही अटक कशी चुकीची आहे, हे सांगण्याचा अनिल देशमुख यांचे वकील प्रयत्न करतील. निल देशमुख यांच्या अटकेनंतर त्यांचे वकील इंद्रपाल सिंह मध्यरात्री ईडी कार्यालयात दाखल झाले. त्यांनी अनिल देशमुख यांची भेट घेतली. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास इंद्रपाल सिंह ईडी कार्यालयातून बाहेर पडले. अनिल देशमुख यांची अटक चुकीची आहे. आम्ही याविरोधात कोर्टात जाणार आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
देशमुखांचे दोन्ही पीए गजाआड
अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. 100 कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुखांचे दोन्ही पीए पालांडे आणि कुंदन यांच्याविरोधात ईडीच्या हाती महत्त्वपूर्ण पुरावे लागले होते. त्याच पुराव्यांच्या आधारच त्यांना बेड्या ठोकल्या होत्या.
नेमकं काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना गेल्या काही दिवसांपूर्वी पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुखांनी आम्हाला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता.
परमबीर सिंह पत्रात काय म्हणाले होते?
त्या पत्रानुसार निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटेलिजन्सचं युनिट हेड होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलावलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं होतं. देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले, तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये जमा होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येऊ शकते. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानी बोलवायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे.
टार्गेटनुसार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश देत होते. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, आदी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रं लिहून हे आरोप केले होते.
(Maharashtra EX Home Minister Anil deshmukh Money Laundering Case Arrest by ED Enforcement Directorate)
हे ही वाचा :
Anil Deshmukh Arrested : तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक