Police Recruitment | पोलीस दलात मेगाभरती, 50 हजार पदं भरणार, दिलीप वळसे पाटील यांची माहिती
पोलीस भरती संदर्भात सरकारकडून केवळ आश्वासन देण्यात आलं होतं, ते पूर्ण करण्यात आलं नाही, असा आरोप विरोधकांनी केला होता. या आरोपावर दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर दिलं.
मुंबई : महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाचं (Maharashtra Assembly Winter Session) काल सूप वाजलं. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी गृह विभाग आणि पोलीस दल यांसदर्भातील चर्चेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर दिली. दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस दलाकडे मनुष्यबळाची कमतरता असून मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन 50 हजार पदांच्या पोलीस भरतीची (Police Recruitment) प्रक्रिया सुरु करणार असल्याचं सांगितलं.
दिलीप वळसे पाटील नेमकं काय म्हणाले?
पोलीस भरती संदर्भात सरकारकडून केवळ आश्वासन देण्यात आलं होतं, ते पूर्ण करण्यात आलं नाही, असा आरोप विरोधकांनी केला होता. या आरोपावर दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर दिलं. आर आर पाटील राज्याचे गृहमंत्री असताना 60 हजार पदांची पोलीस भरती करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी टप्प्या टप्प्यानं पोलीस भरती करण्यात आली होती. त्या काळात पहिल्या टप्प्यात 10 हजार पोलिसांची भरती करण्यात आली होती, अशी माहिती दिलीप वळसे पाटील म्हणाले.
सध्याची भरती पूर्ण करुन नव्यानं भरती
सध्या पहिल्या टप्प्यात 5200 पदांची भरती सुरु आहे. दुसऱ्या टप्प्यात 7 हजार पोलीस भरण्यासंदर्भात कार्यवाही सुरु आहे. राज्यातील पोलिसांचं बळ कमी आहे. त्यामुळं आम्ही मंत्रिमंडळासमोर पोलिसांची 50 हजार पदांची भरती करण्यासंदर्भात माहिती देऊ आणि त्यांसंदर्भात निर्णय घेऊ, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.
एसआरपीएफ च्या जवानांना 12 वर्षानंतर पोलीस दलात येता येणार
दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांना 12 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलात सेवा करता येईल, अशी माहिती दिली. राज्य सरकारचा प्रयत्न हा कालावधी 10 वर्षे करण्याचा प्रयत्न होता. मात्र, 10 वर्षांचा कालावधी करण्यास तांत्रिक अडचणी असल्यानं 12 वर्ष निश्चित करण्यात आल्याची माहिती वळसे पाटील यांनी दिली. तर, होमगार्डमध्ये काम करणाऱ्यांना वर्षामध्ये 180 दिवस काम देण्याचा प्रयत्न राहील, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.
इतर बातम्या:
VIDEO: दोन घेत, चार देत, अत्यंत चांगल्या पद्धतीनं अधिवेशन पार पडलं, अजित पवारांच्या भूमिकेवर भाष्य
Maharashtra Home Minister Dilip Walse Patil said 50 thousand Police constable recruitment process start soon