महाराष्ट्रात धोका वाढला, एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या मंत्र्याला कोरोनाची लागण
महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा डोकंवर काढायला सुरुवात केली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहेत. असं असताना आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा (Corona) धोका वाढताना दिसतोय. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा झपाट्याने वाढ होत असल्याचं चित्र असताना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाचे नेते शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलेली. त्यानंतर आता मंत्री शंभूराज देसाई यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
शंभूराज देसाई यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित याबाबत माहिती दिली आहे. “माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी गृह विलगीकरणात डॉक्टरांकडून उपचार घेत आहे. माझी प्रकृती ठीक असून काळजी करण्याचे कारण नाही”, असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं आहे.
“गेल्या तीन-चार दिवसांमध्ये माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी त्यांना काही लक्षणे आढळल्यास त्वरित कोविड चाचणी करून घ्यावी, ही विनंती आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी”, असे आवाहन शंभूराज देसाई यांनी फेसबुकवर केलं आहे.
राज्यात कोरोनाचा हाहाकार, दिवसभरात तीन मृत्यू, 400 पेक्षा जास्त रुग्ण
महाष्ट्रात पुन्हा कोरोनाचा हाहाकार उडताना दिसतोय. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे राज्यात आज दिवसभरात तब्बल 450 नवे कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. तसेच तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यामुळे प्रशासनदेखील खळबळून जागी झालं आहे. हे संकट असंच गडद होत गेलं तर नवी यंत्रणा उभी करणं प्रशासनासाठी महत्त्वाचं असणार आहे.
राज्यात सध्या 2334 कोरोनाबाधित रुग्ण सक्रिय आहेत. तीन जणांचा मृत्य झाल्याने मृत्यू दर हा 1.82 टक्के इतका आहे. पण तरीही बरे होणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील समाधानकारक आहे. दिवसभरात 316 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती समोर आली आहे. पण रुग्णवाढ रोखणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक गुणाकार होत असतो. त्यामुळे आगामी काळात प्रशासनापुढे मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात रविवारी 397 एवढी कोरोना रुग्ण संख्या होती. सोमवारी ही संख्या 205 एवढी होती. त्यामुळे सरकारची धास्ती वाढली आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी कोविद संदर्भात अधिक माहिती देताना सरकारी आणि खाजगी रुग्णालयांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती दिली होती.