Mumbai Rain | कमरेपर्यंत पाणी, गाड्यांना रस्सीने बांधण्याची नामुष्की, पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण
पहिल्याच पावसाने मुंबईची दाणादाण उडवून दिली. या पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. रस्त्यांना थेट नाल्यांचं स्वरुप प्राप्त झालं. वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. मुंबईच्या अंधेरी भागातील दृश्य तर आपल्याला विचलित करतील इतकी भयानक आहेत.
मुंबई : बहुप्रतिक्षित पाऊस आज अखेर राज्यात दाखल झालाय. मुंबईत आज पहिला पाऊस पडल्यामुळे नागरिकांना आनंद झालाय. मुंबईतील नागरीक उकाड्याने हैराण झाले होते. त्यामुळे पहिल्या पावसामुळे मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका झालीय. पण मुंबईत आलेल्या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची चांगली तारांबळ देखील उडवून दिली. पहिल्याच पावसामुळे मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. विशेष म्हणजे अंधेरीतील धक्कादायक दृश्य समोर आली आहे. अंधेरी सबवेत पाणी साचल्यामुळे मुंबईकरांची अक्षरश: तारांबळ उडाली. यावेळी एका महिलेला वाहून जाण्यापासून वाचवण्यात आलं. तसेच वाहनं वाहून जाऊ नयेत यासाठी ती रस्सीने बांधावी लागली. संबंधित प्रकार कॅमेऱ्यातही कैद झाला आहे.
पहिल्याच पावसामुळे मुंबईत निर्माण झालेली ही परिस्थिती चिंताजनक आहे. अजून पूर्ण पवासाळा बाकी आहे. पहिल्याच पावसात असं सगळं काही बघायला मिळत असल्याने मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे संबंधित घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला जातोय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नालेसफाईचा दौरा केला होता. पण अशाप्रकारे पाणी साचत असल्याने विरोधकांकडून नालेसफाईवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी संबंधित व्हिडीओ ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख करत तक्रार केली आहे.
वर्षा गायकवाड यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
“मुख्यमंत्री महोदय आम्ही आपणांस यापूर्वीच सांगितलं होतं की, मुंबईत नालेसफाईच्या आणि मान्सूनपूर्व कामांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि हलगर्जीपणा करण्यात आला आहे. पण त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. पावसाची पहिली सर आणि मुंबई पहिल्याच पावसात तुंबली आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांनी मान्सूनपूर्व तयारीचे केलेले सर्व दावे फोल ठरले आहेत. धादांत खोटं बोलणारं हे सरकार आणि यांचे अधिकारी”, अशी टीका वर्षा गायकवाड यांनी केली.
मुख्यमंत्री महोदय आम्ही आपणांस यापूर्वीच सांगितलं होतं की, मुंबईत नालेसफाईच्या आणि मान्सूनपूर्व कामांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि हलगर्जीपणा करण्यात आला आहे. परंतु त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही.
पावसाची पहिली सर आणि मुंबई पहिल्याच पावसात तुंबली आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांनी… pic.twitter.com/CXaJS3Ndmc
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 24, 2023
“अंधेरी सबवे, एलबीएस मार्ग, साकीनाका ९० फिट रोड, माटुंगा, पश्चिम द्रुतगती मार्ग तसेच महालक्ष्मी, दादर, माहीम, धारावी, परळ, शिव, किंग सर्कल, कुर्ला, चेंबूर, अंधेरी, मुलुंड, दहिसर आदी ठिकाणच्या सखल भागांत पाणी साचलं आहे. परिणामी, नागरिकांची मोठी गैरसोय होत असून त्यांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. सर्वसामान्यांना जो नाहक त्रास सहन करावा लागत आहे याला जबाबदार कोण? उत्तर द्या”, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.