कोट्यवधींच्या प्रकल्पावरुन राज्याच्या राजकारणात राडा, महाराष्ट्रात चार महिन्यात आले ‘हे’ 9 मोठे प्रकल्प
राज्यात सत्तापालट होऊन नवं सरकार स्थापन व्हायला आता तीन महिन्यांपेक्षा जास्त कार्यकाळ झालाय. या कार्यकाळात राज्यात तब्बल 9 प्रकल्प आल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई : वेदांता फॉक्सकॉन पाठोपाठ टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला जातोय. भारतातील सर्व औद्योगिक प्रकल्प परराज्यात जात असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. विशेष म्हणजे याच प्रकरणावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडताना बघायला मिळत आहेत. पण या सर्व गदारोळादरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यात सत्तापालट होऊन नवं सरकार स्थापन व्हायला आता तीन महिन्यांपेक्षा जास्त कार्यकाळ झालाय. या कार्यकाळात राज्यात तब्बल 9 प्रकल्प आल्याची माहिती समोर आली आहे. भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबतची माहिती जारी केली आहे.
महाराष्ट्रात गेल्या चार महिन्यांत आलेले प्रकल्प :
1) सिनारामस् पल्प अँड पेपर प्रकल्प
संबंधित प्रकल्प हा रायगड जिल्ह्यातील ढेरंड येथे प्रस्तावित आहे. या प्रकल्पातून तब्बल 20 हजार कोटींची राज्यात गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील 3 हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
2) सोलार इंड्रस्ट्रिज इंडिया प्रकल्प
संबंधित प्रकल्प हा नागपूरच्या काटोल तालुक्यात प्रस्तावित आहे. या प्रकल्पातून 387 कोटींची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पातून 840 तरुणांना थेट रोजगार प्राप्त होण्याची शक्यता आहे.
3) महाराष्ट्र सिमलेस लिमिटेड प्रकल्प
रायगडच्या विलेभगड येथे हा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पातून 375 कोटींची गुंतवणूक होणार आहे. तसेच 200 तरुणांना या प्रकल्पातून रोजगार प्राप्त होण्याची शक्यता आहे.
4) सनफ्रेश ऍग्रो इंडस्ट्रीज प्रकल्प
संबंधित प्रकल्प हा राहता अहमदनगरच्या तालुक्यातील रांजणखोल येथे प्रस्तावित आहे. या प्रकल्पातून 662 कोटींची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पातून 142 तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
5) वरूण बेवरजेस लिमिटेड प्रकल्प
संबंधित प्रकल्प हा अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या सुपा येथे प्रस्तावित आहे. या प्रकल्पातून जवळपास 779 कोटींची महाराष्ट्रात गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पातून 450 तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
6) विठ्ठल कॉर्पोरेशन प्रा. लिमिटेड प्रकल्प
संबंधित प्रकल्प हा सोलापूरच्या माढा तालुक्यात प्रस्तावित आहे. या प्रकल्पातून 126 कोटींची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पातून 548 तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
7) आयएफबी रेफ्रिजरेटर्स लिमिटेड प्रकल्प
हा प्रकल्प पुण्यात प्रस्तावित आहे. या प्रकल्प जवळपास 400 कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. या प्रकल्पातून 750 जणांना थेट रोजगार प्राप्त होणार आहे.
8) जेनक्रेस्ट बायो प्रोडक्ट्स प्रकल्प
संबंधित प्रकल्प हा जळगाव जिल्ह्यात प्रस्तावित आहे. या प्रकल्पातून 650 रुपयांची गुंतवणूक होणार आहेत. हा प्रकल्प जळगावच्या भुसावळ तालुक्यातील खडके येथे प्रस्तावित आहे. या प्रकल्पातून 625 रोजगारांची निर्मिती होणार आहे.
9) मेगा पाईप्स प्रायव्हेट लिमिटेड प्रकल्प
संबंधित प्रकल्प हा रायगडच्या सुधागड तालुक्यातील हेडवली येथे प्रस्तावित आहे. या प्रकल्पातून 758 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. तसेच या प्रकल्पातून 375 जणांना रोजगार प्राप्त होणार आहे.