महायुतीकडून मनसेला निवडणूक लढवण्याचा आग्रह, या एका जागेसाठी उमेदवार कोण?
महाराष्ट्रात मनसेसोबत पुन्हा एकदा बोलणी सुरु झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक तरी जागा लढावी अशी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची इच्छा आहे. मनसेसाठी कोणती सीट दिली जाईल आणि कोण असेल उमेदवार जाणून घ्या.
मुंबई : मोदींसाठी महायुतीला जाहीर पाठींबा देत असल्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केलं. पण आता महायुतीकडून पुन्हा मनसेसोबत चर्चा सुरु झाल्याचं कळतंय आहे. मुंबईत मनसेला एक जागेवर लढण्याचा आग्रह आहे. त्यासाठी राज ठाकरे रेल्वे इंजिन चिन्हावर ठाम असल्याची सूत्रांची माहिती आहे. जागा वाटप आपल्याला जमणार नाही ते आपलं ट्रेम्पामेंट नाही असं राज ठाकरे नुकतेच मनसेच्या गुढी पाडव्याच्या मेळाव्यात म्हणाले आहेत आणि राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला. मात्र आता अजूनही एका जागेवरुन चर्चा सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मनसेकडून कोण लढणार?
मुंबईत मनसे एक जागा लढण्यास इच्छुक असल्याचं सूत्रांकडून कळंतय. दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात मनसे अजूनही आशावादी आहे. मात्र रेल्वे इंजिन चिन्हावरच लढण्यावर राज ठाकरे ठाम आहेत. दक्षिण मुंबईत बाळा नांदगावकर स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकी घेत असल्याचं कळतंय. मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सकारात्मक राहण्याच्या सूचना नांदगावकर देत आहेत दक्षिण मुंबई लोकसभेबाबत महायुतीचा तिढा अजूनही सुटलेला नाही. भाजपकडून राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा आणि यशवंत जाधव यांची नावं चर्चेत आहे.
भाजपकडून उमेदवार नाही
आता मनसेकडून बाळा नांदगावकरांना संधी का मिळू शकते का. राहुल नार्वेकरांना उमेदवारी दिल्यास ठाकरे गटा विरोधातला नार्वेकरांनी दिलेला निकाल मतदानावेळी अंगलट येईल अशी भाजपला भीती आहे. म्हणजेच भाजपनं नार्वेकरांना उमेदवारी दिल्यास उद्धव ठाकरेंची शिवसेना भावनिक फायदा उचलू शकते. मंगलप्रभात लोढांनीही 2 दिवसांआधीच राज ठाकरेंची भेट घेतली होती.
मुंबईत पियूष गोयल, मिहीर कोटेचा यांना भाजपनं तिकीट दिलंय, आता मंगलप्रभात लोढांना उमेदवारी दिल्यास भाजपचे मुंबईत 3-3 गुजराती भाषिक उमेदवार होतील, या मुद्द्याचं ठाकरे गट भांडवल करु शकतो. शिंदेंच्या शिवसेनेचे यशवंत जाधव चर्चेत असले तरी लोकसभा निवडणुकीएवढा त्यांचा जनसंपर्क नाही. तर दक्षिण मुंबईत येणाऱ्या लालबाग परळ भागात बाळा नांदगावकरांचा चांगली ताकद आहे. शिवसेनेच्या फुटीमुळं मतांचं विभाजन आणि भाजपच्या मतांमुळं नांदगावकर विजयी होतील असं मनसेला वाटतंय.
इंजिनवर कॉम्प्रोमाईज नाही
दिल्लीत अमित शाहांची भेट आणि त्यानंतर मुंबईत मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर, गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी बिनशर्त पाठींबा जाहीर केला. मात्र या बिनशर्त पाठींब्यामागं वेगळं कारण आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मनसे महायुतीसोबतच आधी लोकसभा लढणार होती. मात्र मुख्यमंत्री शिंदेंनी धनुष्यबाण चिन्हावर लढण्याचा आग्रह धरला आणि ही बाब राज ठाकरेंना मान्य नव्हती. जाहीर सभेतूनही स्वत: राज ठाकरेंनी रेल्वे इंजिन चिन्हावर कॉम्प्रोमाईज नाही, असं सांगितलं होतं.
मनसेनं मुंबईत लोकसभेची तयारी केलीच होती. स्वत: राज ठाकरेंनीही आढावा बैठकाही घेतल्या होत्या. मात्र अचानक महिन्याभराआधी, मनसेचं इंजिन महायुतीच्या चर्चेकडे वळालं आणि भेटीगाठीतून 3 जागांच्या मागणीनंतर 2 जागांवर चर्चा सुरु झाल्याचं स्वत: बाळा नांदगावकरच म्हणाले होते.
मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठींबा जाहीर करतानाच, राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारी लागण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. पण आता पुन्हा मुंबईतल्या एका जागेवरुन आणि तेही रेल्वे इंजिन चिन्हावर लढण्याची चर्चा सुरु झाल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर राज ठाकरेंचे जुने व्हिडीओही व्हायरल होत आहेत.