Mumbai Fire | मुंबईत गिरगावमध्ये भीषण आग, दोघांचा होरपळून मृत्यू, ९ जणांना रेस्क्यू करुन वाचवले
Mumbai Girgaon Building Fire : मुंबईतील गिरगाव चौपाटीवर शनिवारी रात्री एका रहिवाशी बिल्डींगमध्ये भीषण आग लागली. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. चार मजली इमारतींच्या तिसऱ्या मजल्यावर शनिवारी रात्री ही आग लागली.
मुंबई | 3 डिसेंबर 2023 : मुंबईतील गिरगाव चौपाटी भागातून आगीची मोठी दुर्घटना समोर आली आहे. गिरगावमधील एका चार मजली इमारतीला आग लागली. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तीन मजली इमारतींच्या तिसऱ्या मजल्यावर शनिवारी रात्री ही आग लागली. या आगीच्या घटनेची माहिती मिळल्यावर अग्निशमनदलाच्या १५ गाड्या दाखल झाल्या. अग्नीशमन दलाने दोन तास प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी नऊ जणांना रेस्क्यू करुन वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र या घटनेत हिरेन शाह (वय, ६०) आणि नलिनी शाह (८२) या दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान रेस्क्यू करुन काढलेल्या नऊ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आगीचे कारण काय
गिरगावमध्ये ही आग कशामुळे लागली, याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही. परंतु पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली आहे. पोलीस आणि अग्निशमनदलाचे जवान ही आग कशामुळे लागली, याचे कारण शोधत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आगीच्या घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी
गिरगाव चौपाटीमध्ये काल आग लागली होती, त्या ठिकाणी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत करण्याचे आदेश दिले. ज्यांची घर जळालेले आहे त्यांना पाच लाखांची मदत तत्काळ जाहीर केलेली आहे.
वसईत स्कारपीओ गाडीला आग
वसईत उभ्या असलेल्या स्कारपीओ गाडीला भीषण आग लागून ती पूर्णपणे जळून खाक झाली आहे. वसई विरार महापालिकेच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळावर पोहचून आग विझवली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. वसई पश्चिम सनसिटी शंभर फुटी रोडवरील टेम्पो स्टॅण्डवर शनिवारी ही घटना घडली आहे. स्कारपीओ मागच्या एक वर्षांपासून एकाच ठिकाणी उभी होती. अज्ञात गर्दुळ्यांनी ही आग लावली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.