आता आमचा त्यांच्यावर… मनोज जरांगे यांची मुख्यमंत्र्यांवर पहिल्यांदाच थेट टीका
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला चढवला आहे. मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलकांवरील राज्यभरातील गुन्हे मागे घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच अंतरवलीतील घटनेप्रकरणी दाखल केलेले गुन्हेही मागे घेण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता. आता दोन महिने होत आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी काहीच केलं नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
मुंबई | 28 डिसेंबर 2023 : आतापर्यंत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मोर्चा वळवला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वासच राहिला नसल्याची टीका केली आहे. जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांवरील आपली जाहीर नाराजी बोलून दाखवली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील आता कुणाचं ऐकणार नसून आंदोलन करणारच असल्याचं स्पष्ट झालं आहे. येत्या 20 जानेवारी रोजी मुंबईत त्यांचं आंदोलन होणार आहे.
आम्ही आतापर्यंत मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवला. त्यांच्या शब्दांचा सन्मान ठेवला. जे जे मंत्री आले त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यांचा सन्मान केला. पण मुख्यमंत्र्यांनी विश्वासाला पात्र व्हायला हवं होतं ही आमची भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गुन्हे मागे घेऊ असं आश्वासन दिलं. पण तेही केलं नाही. तिथेही ते विश्वासाला पात्र ठरले नाहीत. अंतरवालीतील गुन्हे मागे घेऊ म्हटले. तिथेही विश्वासाला पात्र ठरले नाहीत. उलट आमच्याच लोकांना अटक केली. आमच्याच लोकांना नोटीसा देत आहेत, असा हल्लाच मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांवर चढवला.
आम्ही मागे हटत नाही
नोटिसा दिल्याने वातावरण दुषित होत आहे. लोकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. लोकांना लोकशाहीच्या मार्गाने मुंबईत येऊ द्या. तुम्ही असं काय करत आहात? तुम्ही कायदा का पायदळी तुडवता. तुम्ही शांततेचं आंदोलन होऊ द्या. ते होणारच आहे. तुम्ही गोळ्या जरी घातल्या ना तरी आम्ही माघार घेणार नाही. आम्ही मागे हटत नाही आता, असं जरांगे पाटील म्हणाले.
पुन्हा संधी नाही
20 तारखेच्या आत अंतरवलीच्या बाहेर पाऊल टाकेपर्यंत सरकारने आम्हाला आरक्षण द्यावं. आता चर्चाफिर्च्या नाही. फक्त आरक्षण द्या. आम्ही एक घंटाही वेळ देणार नाही. भारतानेच काय जगाने एवढी गर्दी पाहिली नसेल एवढा मराठा समाज बाहेर पडेल. मुंगीलाही पाय ठेवायला जागा राहणार नाही. मुंबईकरांना थोडा त्रास होईल. सहन करा. मराठा बांधवांना विनंती आहे, तुम्ही सर्व या. आम्हाला बोलावलं नाही, असं समजू नका. मतभेद गटतट बाजूला ठेवून या. महाराष्ट्रातील सर्व मंत्री, आमदार, खासदार, माजी आमदार खासदार आणि मंत्र्यांनीही आमच्यासोबत यावं. ही शेवटची वेळ आहे. यानंतर पुन्हा संधी नाही, असं ते म्हणाले.