Manoj Jarange Patil : 2024 ला काय करणार?; एक्सक्ल्युसिव्ह मुलाखतीत मनोज जरांगे पाटील यांचा इशारा काय?
शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या आम्ही मागास आहोत. तरीही आम्हाला आरक्षण नाही. ओबीसीतील अनेक जातींकडे दस्ताऐवज नसतानाही आरक्षण दिलंय. आम्हाला का दिलं जात नाही? कुणब्यांची पोटजात मराठा होत नाही का? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
मुंबई | 18 ऑक्टोबर 2023 : जालना येथील सभा यशस्वी झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आता सरकार विरोधात दंड थोपाटले आहेत. कोणत्याही परिस्थितीत आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. आरक्षण दिलं नाही तर आम्ही शांततेत आंदोलन करू. पण आमचं आंदोलन सरकारला झेपणार नाही, असं सांगतानाच मराठा समाजात प्रचंड संताप आहे. आक्रोश आहे. खदखद आणि वेदना आहे. 2024मध्ये सरकारला सर्व दिसेलच, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी टीव्ही9 मराठीला एक्सक्ल्युसिव्ह मुलाखत दिली. यावेळी त्यांनी सरकारला गंभीर इशारा दिला. जालन्यातील सभा ही सभा नव्हती. ती समाजाची वेदना होती. ही वेदना सरकारने समजून गेतली पाहिजे. आरक्षणासाठी आम्ही त्यांना वेळ दिला नाही. त्यांनी आमच्याकडून वेळ घेतला आहे. त्यामुळे त्यांना आरक्षण द्यावं लागणार आहे. त्याशिवाय आम्ही त्यांना सोडणार नाही. आम्ही तीन ते चार वेळा सरकारला वेळ दिला. आधी 40 वर्षापासून वेळ दिला. त्यामुळे आम्ही आरक्षण मागत आहोत. प्रत्येक पिढीने आता आंदोलन करावं हे पटत नाही. आरक्षण आमचा हक्क आहे. ते आम्हाला मिळालचं पाहिजे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आम्हीही मागासच
आम्ही कोणत्या निकषात आम्ही बसत नाही ते सांगा. एखादी जात आरक्षणात असावी यासाठी ते मागास असावेत हा निकष आहे. आम्ही मागास असल्याचं गायकवाड आयोगाने म्हटलं आहे. त्यामुळे आम्हाला आरक्षण द्यावं. ओबीसींची एकही जात मागास सिद्ध नाही. ते व्यवसायाने आरक्षणात गेले. आमचाही व्यवसाय शेती आहे. त्यामुळे आम्हाला आरक्षणात का घेतलं जात नाही? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला.
सुप्त लाट दिसणार नाही
आमचं आंदोलन शांततेत होणार. पण सरकारला झेपणार नाही. आता हे शेवटचं आंदोलन आहे. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही. सुप्त लाट त्यांना दिसत नसेल,पण 2024ला त्यांना दिसेल. आम्ही समाजाला विचारूनच निर्णय घेऊ. आम्ही पाठीत खंजीर खुपसणार नाही. अंधारात ठेवणार नाही, समाजाला विचारणार. आणि मग काय करायचं ते जाहीर करणार, असंही ते म्हणाले.
आमच्याकडे काय समुद्र आहे काय?
आरक्षण 50 टक्क्याच्यावर गेलं म्हणून मिळालं नाही. आम्ही मागास नाही तर दीड वर्ष आरक्षण का दिलं? मराठा आरक्षणाशी संबंधित सर्व अहवाल कोर्टासमोर आलाच नाही. आम्ही त्या निकषात बसतो की नाही. व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिलं असेल तर आमच्या अर्ध्या भावांना आरक्षण आहे. आम्हाला का नाही? विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षण आहे असं एका मंत्र्याला विचारलं. तर ते म्हणाले त्यांचा व्यवसाय शेती आहे. मग आमच्याकडे काय समुद्र आहे का? आम्हीही शेतीच करतो ना? मग द्या आम्हाला आरक्षण, अशी मागणी त्यांनी केली.