मराठा आरक्षणासाठी मुंबईत सर्वपक्षीय बैठक, पण लढाईतले ‘म्होरके’ नेते अनुपस्थित
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावली. या बैठकीला स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक नेते उपस्थित राहीले. पण या बैठकीत मराठा आरक्षणाच्या लढाईतील 'म्होरके' नेते अनुपस्थित राहीले.
मुंबई | 11 सप्टेंबर 2023 : मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या 14 दिवसांपासून आरक्षण सुरु आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाच्या नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी त्यांची मागणी आहे. मराठवाडा महाराष्ट्रात विलीन होण्याआधी निजामशाहीच्या काळात मराठा समाजाच्या नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत होतं. पण मराठवाडा महाराष्ट्रात विलीन झाल्यानंतर मराठ्यांचं कुणबी आरक्षण गेलं. त्यामुळे मराठवाड्यातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं. तसेच राज्यभरातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावं, अशी जरांगे पाटील यांची भूमिका आहे.
मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज रात्री सह्याद्री अतिथीगृह येथे सर्वपक्षीय बैठक बोलावली. या बैठकीला राज्यातील अनेक दिग्गज सर्वपक्षीय नेते उपस्थित राहीले. पण मराठा आरक्षणासाठी राज्याच्या मराठा आरक्षण मंत्री उपसमितीचं नेतृत्व करणारे दोन नेते या बैठकीला अनुपस्थित होते. विशेष दोन्ही नेते मोठ्या पदावरचे आजी-माजी मंत्री आहेत.
मराठा आरक्षणाच्या लढाईतले दोन म्होरके नेते अनुपस्थित
मराठा आरक्षणाबाबत बोलावलेल्या या सर्वपक्षीय बैठकीला मराठा आरक्षण मंत्री उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे अनुपस्थित राहीले. तसेच या उपसमितीचे माजी अध्यक्ष अशोक चव्हाणही या बैठकीला अनुपस्थित राहीले. आजी-माजी अध्यक्ष अनुपस्थित असल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही नेते हे मराठा आरक्षणाच्या लढाईतील म्होरके आहेत. पण तेच या महत्त्वाच्या बैठकीत अनुपस्थित असल्याने चर्चांना उधाण आलंय.
याशिवाय विविध पक्षांचे नेते विनय कोरे, बच्चू कडू, जोगेंद्र कवाडे, महादेव जानकर, हितेंद्र ठाकूर, रवी राणा, अशोक चव्हाण, नाना पटोले, गिरीश महाजन, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, जयंत पाटील (शेकाप नेते) हे नेते देखील या बैठकीला अनुपस्थित होते.
बैठकीतील इसनाईड स्टोरी
दरम्यान, मराठा आरक्षणाबाबतच्या सर्वपक्षीय बैठकीतील इनसाईड स्टोरी ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे. “मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेऊन त्यात आरक्षण देता येईल का? ते पाहा”, अशी भूमिका माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मांडली आहे. “राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी”, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. तर “मराठा आरक्षण सिमिती करा. अजित पवार यांना या समितीचं अध्यक्ष करा”, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले आहेत.
या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादा भुसे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विविध पक्षांचे निमंत्रित सर्वश्री छत्रपती संभाजीराजे भोसले, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल परब, राजेश टोपे, चंद्रशेखर बावनकुळे, आमदार राजू पाटील, विनोद निकोले, सदाभाऊ खोत, राजेंद्र गवई, सुनील तटकरे, गौतम सोनवणे आदी उपस्थित होते.