‘काळाघोडा परिसरातील इस्राईलच्या माजी पंतप्रधानांच्या नावाचा फलक हटवा’, समाजवादी पार्टीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबईच्या काळाघोडा परिसरातील एका चौकास इस्त्राईलचे माजी पंतप्रधान सिमॉन पेरेस यांचं नाव देण्यात आलं आहे (MLA Rais Shaikh letter to CM Uddhav Thackeray).
मुंबई : मुंबईच्या काळाघोडा परिसरातील एका चौकास इस्त्राईलचे माजी पंतप्रधान सिमॉन पेरेस यांचं नाव देण्यात आलं आहे. मात्र, या गोष्टीला समाजवादी पक्षाचे नेते आमदार रईस शेख यांनी विरोध केला आहे. सिमॉन पेरेस यांच्या नावाचे फलक हटवण्यात यावे, अशी मागणी शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे (MLA Rais Shaikh letter to CM Uddhav Thackeray).
रईस शेख पत्रात नेमकं काय म्हणाले?
“मी आपणांस सांगू इच्छितो की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात लोकप्रतिनिधीचा अवमान करत चुकीच्या पद्धतीने चौकाचे नामकरण करण्याचा नवीन पायादंड बृहन्मुंबई महानगरपालिकेने सुरु केला आहे आणि हे अत्यंत खेदजनक आहे”, असं रईस शेखल पत्रात म्हणाले (MLA Rais Shaikh letter to CM Uddhav Thackeray).
“मुंबईतील फोर्ट येथील काळा घोडा परिसरातील चौकाला इस्त्राईलचे दिवंगत पंतप्रधान सिमॉन पेरेस यांचे नाव देण्याचा प्रस्ताव पालिकेतील गटनेत्यांच्या सभेमध्ये सन 2018 मध्ये आला होता. त्यावेळी तत्कालीन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी समाजवादी पक्ष तसेच इतर पक्षातील गटनेत्यांच्या विरोधामुळे हा प्रस्ताव मंजुर केला नाही. त्यानंतर पुन्हा सदर प्रस्ताव हा प्रभाग समितीमध्ये सादर करण्यात आला आणि त्याठिकाणी देखील अनेक नगरसेवकांनी जोरदार विरोध केल्यामुळे सदर विषयाचा प्रस्ताव नामंजूर झाला”, असं त्यांनी पत्रात सांगितलंय.
“या दोन्ही बाबी घडूनसुद्धा महानगरपालिकेकडून काळा घोडा परिसरातील एका चौकास इस्त्राईल देशाचे माजी पंतप्रधान सिमॉन पेरेस यांच्या नावाचे फलक लावण्यात आले आहे आणि ही बाब अत्यंत चुकीची आहे”, असं मत त्यांनी पत्रात मांडलंय.
“भारताच्याच काय मुंबईच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक तसेच राजकीय क्षेत्रात श्री.सिमॉन पेरेस यांचे कुठलेही योगदान नाही. त्यामुळे त्यांचे चौकाला नाव देणे योग्य नाही हे नामकरण झाल्यास कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. कारण समाजवादी पक्षाने याबाबत प्रत्येक वेळी तीव्र विरोधक केला आहे आणि आपली भूमिका मांडली आहे. त्यामुळे ह्याप्रकारच्या चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेल्या नामकरण फलकाविरोधात समाजवादी पक्षाकडून तीव्र आंदोलन केले जाईल”, असा इशारा त्यांनी दिला.
“माझी आपणांस विनंती आहे की, ए विभागातील काळा घोडा परिसरातील बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेल्या सिमॉन पेरेस यांच्या नावाचा फलक तात्काळ हटविण्याबाबत महानगरपालिकेला आदेश देण्यात यावेत”, अशी विनंती त्यांनी केली.
हेही वाचा : जयंत पाटलांच्या स्वागताच्या बॅनर्सवरुन नाथाभाऊ गायब; खडसेंच्या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीची गटबाजी