MLC Election 2022: शिवसेनेचे मिशीवाला मामा अडचणीत? बावनकुळे, खडसे आणि अजित पवार यांची अचानक भेट
MLC Election 2022: विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी दोन उमेदवार दिले आहेत. तर भाजपने पाच उमेदवार दिले आहेत. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक होत आहेत. पण भाजपने एक अतिरिक्त उमेदवार दिल्याने ही निवडणूक चुरशीची झाली आहे.
मुंबई: विधान परिषद निवडणुकीचं मतदान (MLC Election 2022) सुरू आहे. निम्म्याहून अधिक आमदारांनी मतदान केलेलं आहे. एकीकडे मतदानाची घाई सुरू असतानाच दुसरीकडे भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) हे थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या दालनात पोहोचले आहेत. अजितदादांच्या दालनात राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसेही उपस्थित आहेत. या तिघांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. विधान परिषदेची निवडणूक असल्याने त्यावरच या तिघांमध्ये बंददाराआड चर्चा सुरू झाल्याचं सांगितलं जातंय. विशेष म्हणजे भाजपच्या आमदारांना निवडून आणण्याची जबाबदारी भाजपने ज्या ज्या आमदारांवर सोपवली आहे. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळेही आहेत. त्याच बावनकुळेंनी थेट अजित पवार यांची भेट घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. बावनकुळे यांच्या भेटीचे अनेक अर्थ काढले जात आहेत. बावनकुळे यांच्या या भेटीमुळे मिशीवाला मामा म्हणून प्रसिद्ध असलेले शिवसेनेचे उमेदवार आमशा पाडवी यांचा गेम तर होणार नाही ना? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी दोन उमेदवार दिले आहेत. तर भाजपने पाच उमेदवार दिले आहेत. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक होत आहेत. पण भाजपने एक अतिरिक्त उमेदवार दिल्याने ही निवडणूक चुरशीची झाली आहे. सकाळपासूनच राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांनी सर्वात आधी मतदान केलं. त्यानंतर काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांनी मतदान सुरू केलं आहे. मतदान जोरात सुरू असतानाच चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट अजितदादांचं कार्यालय गाठलं. या ठिकाणी एकनाथ खडसेही उपस्थित आहेत. त्यामुळे या तिघांमध्ये गेल्या अर्धातासापासून चर्चा सुरू आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
खडसेंना पाडण्याच्या चर्चा
दरम्यान, भाजपच्या रडारवर भाई जगताप ऐवजी एकनाथ खडसे असल्याचं सांगितलं जात आहे. ही चर्चा सुरू असतानाच बावनकुळे यांची खडसे आणि अजितदादांसोबत चर्चा सुरू झाल्याने खडसे सेफ झाल्याची चर्चाही सुरू आहे. या निवडणुकीत खडसेंना कोणताही धोका नसल्याचंही सांगितलं जात आहे.
बोंडेंचं विधान आणि बावनकुळेंची भेट
शिवसेनेचा एक मिशीवाला मावळा धोक्यात आहे. सरकार वाचवण्यासाठी शिवसेना आपल्या मावळ्याचा बळी देण्याच्या तयारीत आहे, असं गंभीर विधान भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केलं होतं. त्यानंतर अवघ्या काही तासातच बावनकुळे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे खडसे आणि जगताप यांना सेफ करून शिवसेनेच्या उमेदवाराचा तर गेम करायचा नाही ना? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
शिवसेनेचे दोन्ही उमेदवार सेफ?
विधान परिषदेच्या गणितानुसार शिवसेनेकडे त्यांच्या हक्काच्या आमदारांची 55 मते आहेत. विजयासाठी प्रत्येकी 26 मतांची गरज आहे. त्यामुळे शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी विजयी झाल्यानंतर सेनेकडे दोन मते अतिरिक्त उरतात. याशिवाय बच्चू कडू, यशवंत गडाख, आशिष जैस्वाल, गीता जैन, चंद्रकांत पाटील यांची पाच मतेही शिवसेनेकडेच आहे. म्हणजे शिवसेनेकडे अतिरिक्त 7 मते आहेत. त्यामुळे शिवसेनेचे आमशा पाडवी यांचा पराभव होणं शक्यच नाही, असं सूत्रांचं म्हणणं आहे. मात्र, मतांची एवढी भरमसाठ बेगमी असूनही शिवसेनेचे आमदार फुटल्यास शिवसेनेसाठी हा मोठा धक्का असेल असंही सांगितलं जात आहे.