संघर्ष हा तुमच्या राजकारणाचा स्थायीभाव, राज्यांच्या स्वायत्तेसाठीचा आग्रही आवाज तुम्ही बनाल : राज ठाकरे
तृणमूल काँग्रेसच्या विजयानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवर ममता दीदींचे मनापासून अभिनंदन केलं आहे (Raj Thackeray congratulate Mamata Banerjee).
मुंबई : पश्चिम बंगालचा गड सांभाळण्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना यश आलं आहे. ममता यांच्या तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांना जनतेने पुन्हा एकदा सर्वाधिक मतांनी पसंती दिली आहे. तृणमूल काँग्रेसच्या या विजयानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवर ममता दीदींचे मनापासून अभिनंदन केलं आहे. या निवडणुकीत भाजपचं कडवं आव्हान ममता यांच्यापुढे होतं. पण त्या आव्हानाला ममता यांनी पुरेपूर तोंड देत त्या निर्भिडपणे लढल्या. त्यांच्या संघर्षाबाबत राज ठाकरे यांनी ट्विटरवर उल्लेख केला आहे (Raj Thackeray congratulate Mamata Banerjee).
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
“पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या लक्षणीय यशासाठी ममता बॅनर्जीचं अत्यंत मनापासून अभिनंदन! संघर्ष हा तुमच्या राजकारणाचा स्थायीभाव राहिला आहे आणि या ह्या निवडणुकीत संघर्षाती परिसीमा गाठत तुम्ही हे नेत्रदीपक यश मिळवलंत. कलासक्त वृत्ती आणि सामाजिक सुधारणांची खूप मोठी परंपरा, ह्या बाबतीत महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल यांच्यात खूपच समानता आहे. त्यामुळेच राज्यांची स्वायत्ता आणि प्रांतिक अस्मिता ह्याचं महत्त्व तुम्ही नक्कीच समजू शकता. राज्यांच्या स्वायत्तेसाठीचा आग्रही आवाज तु्म्ही बनाल आणि सर्वसमावेश भूमिका घेत पश्चिम बंगालचा विकास साधाला अशी आशा मी व्यक्त करतो. तुम्हाला मिळालेल्या यशासाठी तुमचं आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन”, असं राज ठाकरे म्हणाले (Raj Thackeray congratulate Mamata Banerjee).
#BengalElections2021 #MamtaBanerjee #Didi @MamataOfficial @AITCofficial pic.twitter.com/RKWBoSAClM
— Raj Thackeray (@RajThackeray) May 2, 2021
बंगालमध्ये नेमकं कोण जिंकलं?
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय. अजूनही मतमोजनी सुरु आहे. मात्र, आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार तृणमूल काँग्रेस 214, भाजप 76 तर इतर 2 जागांवर आघाडीवर आहेत. या निवडणुकीत भाजपला 100 जागांच्या आत थांबवण्यात तृणमूलला यश आलं आहे. तर काँग्रेस आणि डाव्या पक्षांचा बंगालमध्ये मोठा पराभव झाला आहे.
ममता बॅनर्जी यांचा पराभव
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये चांगलं यश मिळालं असलं तरी ममता बॅनर्जी यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. ममता यांनी नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी यांनी ममता यांना नंदीग्राम येथून निवडणूक लढण्याचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी ममता यांनी यावेळी नंदीग्राम येथून निवडणूक लढवली. या मतदारसंघात ममता आणि शुभेंदू यांच्यात कांटेकी टक्कर बघायला मिळाली. मात्र, मतमोजनीच्या शेवटच्या टप्प्यात ममता बॅनर्जी या पिछाडीवर गेल्या आणि त्यांचा पराभव झाला.
हेही वाचा : बॅनर्जींचा नंदीग्राममधून पराभव, निकालात छेडछाड केल्याचा आरोप