विशेष अधिवेशनाआधीच राज ठाकरे यांची रोखठोक प्रतिक्रिया; मराठा आरक्षणावर काय म्हणाले?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शारदाश्रम शाळेतील पालकांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर संतापही व्यक्त केला. तसेच उद्या होणाऱ्या मराठा आरक्षणासाठीच्या विशेष अधिवेशनावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. आरक्षण मिळणार की नाही? यावर राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.
निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 19 फेब्रुवारी 2024 : मराठा समाजातील सग्यासोयऱ्यांनाही आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने नोटिफिकेशन काढले आहे. त्याचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी राज्य सरकारने उद्या विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्यामुळे उद्यापासून कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजाचा ओबसीत समावेश होणार आहे. त्यामुळे या अधिवेशनाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रोखठोक भूमिका व्यक्त केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मराठा आरक्षणाबाबत विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी आपली रोखठोक भूमिका व्यक्त केली आहे. विशेष अधिवेशनाने काही होणार नाही. हा विषय राज्याचा नाही, हा केंद्राचा आणि सुप्रीम कोर्टाचा विषय आहे. यात काही टेक्निकल प्रॉब्लेम आहेत. ते सुटल्याशिवाय हा विषय पुढे जाणार नाही. सर्व झुलवलं जातयं, भुलवलंय जातंय. हाताला काही लागणार नाही. मी त्या दिवशी त्यांच्यासमोरच जाऊन सांगितलं, हाताला काही लागणार नाही, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
राज ठाकरे संतापले
दरम्यान, राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शारदाश्रम शाळेतील पालकांचे म्हणणे ऐकून घेतले. शिक्षकांना निवडणूक कामाला लावण्यात आले आहेत. त्यावर राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. दर पाच वर्षांनी निवडणुका येतात. हे जगजाहीर आहे. मग पाच वर्ष निवडणूक आयोग काय झोपा काढतो का? त्यांना निवडणुकीची तयारी का करता येत नाही? शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला लावल्यानंतर विद्यार्थ्यांचा अभ्यास कोण घेईल? त्यांचं शैक्षणिक नुकसान झालं तर त्याला जबाबदार कोण? असे सवाल करतानाच निवडणूक आयोगावरच कडक कारवाई केली जावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
साहेबांचे आभार
तर, आमची मुलं मराठी शाळेत शिकतात. तिथले शिक्षक निवडणूकीच्या कार्यक्रमाला बोलवले जात आहेत. ज्या वयात मुलांवर संस्कार होतात, त्यावेळी शिक्षकांना निवडणूकीची कामं दिली जातायत. आज राज साहेबांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल आम्ही आभारी आहोत, अशी प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली.
मनसे कामाला लागली
निवडणूक कायम येत असतात. तर मग नियोजन का केलं जात नाही? आम्ही साहेबांशी बोलत असताना त्यांनी काही उपाय सूचवले आहेत. त्यावर आम्ही चर्चा करू. त्यानंतर निवडणूक आयोगाशी बोलून आमचं म्हणणं मांडू. पण शिक्षकांनी कामावर रुजू होऊ नये, मनसे कायम त्यांच्या पाठीशी आहे. मनसे आजपासून या कामाला लागलीय, अशी प्रतिक्रिया मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.