‘वेल्डिंगवाल्याचे चष्मे घालून फिरतो’, मनसेच्या यशवंत किल्लेदार यांची सदावर्तेंवर सडकून टीका
मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सडकून टीका केली आहे. "वेल्डिंगवाल्याचे चष्मे घालून फिरतो, सर्कशितल्या जोकरचा जसा वावर असतो तसा त्याचा वावर असतो", अशी टीका यशवंत किल्लेदार यांनी केली आहे.
मुंबई | 27 जानेवारी 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं कर्तृत्व काय? असा सवाल वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “सदावर्ते वेल्डिंगवाल्याचे चष्मे घालून फिरतो”, अशी टीका यशवंत किल्लेदार यांनी केली आहे. “सरकार सदावर्तेंच्या सुरक्षेसाठी 21 लाख का खर्च करतं?”, असा सवाल किल्लेदार यांनी केला आहे. मनसे नेते मलिंद पांचाळ यांनीदेखील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका केलीय. “प्रत्येकवेळेला काहीतरी बरळायचं आणि त्यानंतर वाद निर्माण करायचे, मग ते वाद मिटवायचे, ते वाद एसटी कामगार संदर्भातील असतील किंवा कधी जातीविषयक असतील, अशा माणसाला सरकार फुकटचं पोसतंय. कारण त्याच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा ताफा असतो. या माणसासाठी सरकार महिन्याकाठी कमीतकमी 30 ते 40 लाख रुपये खर्च करतं. हा पैसा जनतेचा आहे. हे सरकारला कळत नाही का? हा सरकारचा जावई आहे का?” असा सवाल मिलिंद पांचाळ यांनी केला. त्यांच्या या टीकेवर सदावर्ते यांनी टीका केली.
सदावर्ते नेमकं काय म्हणाले?
“हे काय जावई आहेत का, टोल नाक्यावर कॅमेरे लावले आहेत, किती खणखण, कटकट नोटा मोजल्या जात आहेत, हे बघायला ते कोण आहेत? त्यांचा राज ठाकरे काय मालक झालाय का? राज ठाकरेंचं कर्तृत्व काय, राज ठाकरेंची पार्श्वभूमी काय? असं बोलायला गेलं तर खूप बोलू शकतो, आज तो विषय नाही. त्यांनी टोलनाके बघावे आणि टोल नाक्यावरील किती पैसे मोजणं चालू आहे ते बघावं. त्यांनी सरकारला शहाणपण शिकवण्याएवढं आणि माझ्यावर टीका करण्याएवढे ते मोठे नाहीत. वन टू वन राज ठाकरे आणि सदावर्ते येऊद्या, मी सांगतो. कुणी कार्यकर्ते, छोटी-छोटी माणसं बोलत असतील तर त्यांच्यावर मी रागावणार नाही”, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
किल्लेदार काय म्हणाले?
“सदावर्ते यांच्यावर 21 लाख खर्च करण्याइतपत त्यांचं महाराष्ट्रासाठी काय योगदान आहे? या माणसाचं जनतेसाठी, नागरिकांसाठी काय योगदान आहे की, शासनाने या माणसाला सुरक्षा पुरवावी?”, असा सवाल यशवंत किल्लेदार यांनी केला. “शांत बस, उगाच आमच्या नादाला लागू नकोस. मुर्खाच्या नंदनवनात फिरणारा हा माणूस, त्याचं स्वत:चं एक अस्तित्व नाही. तो वेल्डिंगवाल्याचा चष्मा घालून फिरतो. सर्कशीतल्या जोकरप्रमाणे त्याचा वावर असतो”, अशी टीका यशवंत किल्लेदार यांनी केली.
“सदावर्ते हा कोण आहे? मुर्खाच्या नंदनवनात फिरणारा हा माणूस स्वतःच अस्तित्व नाही. वेल्डिंगवाल्याचा चष्मा घालून फिरतो. जोकर सारख्या माणसांवर प्रतिक्रिया देणं म्हणजे स्वतःचं इन्सर्ट करून घेण्यासारखं आहे. मूर्ख माणसा राज ठाकरे समोर बोलायची किंवा उभं राहायची तुझी पात्रता आहे का? राज ठाकरे सोड पहिले महाराष्ट्र सैनिकांनसमोर डिबेट करायला ये. स्वतःची पात्रता कळेल. शांत बस उगाच आमच्या नादाला लागू नकोस”, असा इशारा किल्लेदार यांनी सदावर्तेंना दिला.