Navneet Rana : इकडे राणांना जामीन मिळाला आणि तिकडं बीएमसीचं पथक ‘हातोड्या’साठी घरी पोहोचलं, आता नवं आव्हान
खार पश्चिम भागातील 14 रस्त्यावर La-vie या 9 मजल्याच्या इमारतीत 8 व्या मजल्यावर नवनीत आणि रवी राणा दाम्पत्याचे घर आहे. याच घरात राणा दाम्पत्यानी अनाधिकृत बांधकाम केल्याच्या संशयावरून मुंबई महापालिकेने नोटीस बजावली आहे.
मुंबईः अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना एकिकडे मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला तर दुसरीकडे बीएमचीचं (BMC) पथक अॅक्टिव्ह झालं. राणा दाम्पत्याच्या मुंबई येथील घरावर कारवाई करण्यासाठी बीएमचीचं पथक त्यांच्या घरी पोहोचलं. राणा यांच्या या घराला मुंबई महापालिकेने अनधिकृत बांधकाम प्रकरणी नोटीस बजावली आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या खार येथील घरावर आता बीएमसी कारवाईच्या तयारीत आहे. इकडे राणा दाम्पत्याचा जामीन मंजूर होताच बीएमसीचे अधिकारी राणा दाम्पत्याच्या घरी पोहोचले. मात्र घर बंद असल्यामुले आज तरी या घरावर काहीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेचं पथक या घरावरून माघारी फिरलं. पण अनधिकृत बांधकामाची नोटीस मिळाल्यानं राणा दाम्पत्यासमोर आणखी एक आव्हान उभं ठाकलं आहे.
कोणत्या घरावर कारवाई?
नवनीत राणा आणि रवी राणा यांचं मुंबईतील खार उपनगरातील घराला बीएमसीनं नोटीस बजावली आहे. खार पश्चिम भागातील 14 रस्त्यावर La-vie या 9 मजल्याच्या इमारतीत 8 व्या मजल्यावर नवनीत आणि रवी राणा दाम्पत्याचे घर आहे. याच घरात राणा दाम्पत्यानी अनाधिकृत बांधकाम केल्याच्या संशयावरून मुंबई महापालिकेने नोटीस बजावली आहे. त्यानुसार राणा यांच्या घरी आज बीएमसीचे अधिकारी पोहोचले मात्र त्यांचं घर बंद असल्यामुळे माघारी फिरले.
राणा दाम्पत्याला कोणत्या अटींवर जामीन मंजूर?
नवनीत राणा आणि रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन दिला असून राणा दाम्पत्यासमोर न्यायालयानं काही अटीदेखील टाकल्या आहेत. राणा दाम्पत्य जामीनावर असताना त्यांना माध्यमांशी बोलण्यास मज्जाव असेल. माध्यमांशी बोलल्यास जामीन रद्द होणार. 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला असून हमी देताना फसवणूक झाल्यासही जामीन अर्ज रद्द होऊ शकतो. तसेच तपासादरम्यान, पुराव्यांशी छेडढाड केली किंवा तपास प्रभावित होईल, असं कृत्य केल्यास जेलची हवा खावी लागू शकते.