कोकणातील रेल्वे प्रवास आता अधिक मस्त, विस्टाडोम कोचमुळे मिळेल निसर्गाचा आनंद
मुंबईवरुन गोवा जाताना कोकणातील निसर्ग सौंदर्य न्याहाळण्याचा आनंद म्हणजे एक पर्वणी असते. मुंबई गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्यांना आणखी एक चांगली बातमी आहे. त्यांच्यांसाठी विस्टाडोम कोच तेजस एक्स्प्रेसला जोडण्यात येणार आहे.
मुंबई : पुणे मुंबई प्रवास करणारे प्रवाशी विस्टाडोम कोचचा आनंद घेत प्रवास करतात. पुण्याला जाणारी डेक्कन क्वीन व डेक्कन एक्सप्रेस, प्रगती एक्स्प्रेसला विस्टाडोम कोच आहे. आता मुंबई-कोकण दरम्यानचा रेल्वे प्रवास अधिक चांगला व निसर्गासोबत होणार आहे. मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या प्रगती एक्स्प्रेसला अजून एक विस्टाडोम कोच जोडण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना आधिक आरामदायी अन् निसर्गाचा आनंद घेत प्रवास करता येणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी तेजस एक्स्प्रेसला आणखी एक कोच जोडण्याचा निर्णय जाहीर केला. १४ एप्रिलपासून तेजस एक्स्प्रेसला दोन विस्टाडोम कोच असणार आहेत.
मिळणार निसर्गाचा आनंद
मुंबईवरुन गोव्याला जाताना कोकणातील सौंदर्य न्याहाळण्याचा आनंद वेगळाच असतो. मुंबई-करमाळी तेजस एक्स्प्रेसला विस्टाडोम कोच जोडण्यात येणार आहे. कोकणात जाणारे प्रवासी १४ एप्रिलपासून तेजस एक्स्प्रेसमध्ये विस्टाडोम कोचने देखील प्रवास करू शकणार आहेत. विस्टाडोममध्ये एका डब्यात ४० प्रवासी असणार आहेत.
कसा असतो विस्टाडोम कोच
विस्टाडोम कोच हा प्रशस्त असतो. वातानुकुलित असणार्या या डब्यामध्ये आरामदायी आसन व्यवस्था आहे. तसेच काचेच्या प्रशस्त खिडक्यामुळे निसर्गाचा चांगला आनंद घेता येतो. प्रशस्त खिडक्या व छतावरही काच लावल्यामुळे डोंगरदर्यांचे विहंगम दृश्य डोळ्यात साठवता येते. विस्टाडोम कोचमध्ये एलईडी लाईट, रोटोबल सीट अन् जीपीएसवर आधारित सूचना प्रणाली असते.
देशातील एकमेव गाडी ठरणार
विस्टाडोम कोच मुंबई पुणेकरांच्या चांगल्या पसंतीला आला आहे. गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांमध्येही लोकप्रिय आहे. कोकणातील नद्या, धबधबे, डोंगरदऱ्या यांचा आनंद या कोचमुळे मिळेल. तेजस एक्स्प्रेसला मागील वर्षी विस्टाडोम कोच बसवण्यात आला होता. आता १४ एप्रिलला दुसरा कोच बसवण्यात येणार आहे. यानंतर मुंबई -गोवा तेजस एक्स्प्रेस देशातील दोन विस्टाडोम कोच असणारी एकमेव गाडी ठरणार आहे.
वंदे भारतही मिळणार
मुंबईकर आणि कोकणातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आलिशान आणि वेगवान वंदेभारत लवकरच मुंबई ते गोवा मार्गावर चालविण्याचे आश्वासन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब यांनी दिले आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्यांना चाकरमान्यांचा फायदा होणार असून त्यांचा प्रवास सेमी हायस्पीड वंदेभारतमधून सुसाट वेगाने होणार आहे. अलीकडे सीएसएमटी ते सोलापूरआणि साई नगर – शिर्डी अशा दोन वंदेभारतचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.