Maharashtra Bandh : महाराष्ट्र बंद केला तर कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचा आदेश, मविआला मोठा धक्का
कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर तसा कुणी प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश मुंबई हायकोर्टाने सरकारला दिले आहेत.
महाराष्ट्रासाठी सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बदलापुरात दोन चिमुकल्या मुलींवर घडलेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या या आवाहनानंतर मुंबई हायकोर्टात महाराष्ट्र बंदच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने या प्रकरणात महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. कोर्टाचे हे आदेश महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का देणारे आहेत. कोर्टाच्या आदेशानंतर आता महाविकास आघाडीचे नेते काय निर्णय घेतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई हायकोर्टाने काय म्हटलं?
कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर तसा कुणी प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश मुंबई हायकोर्टाने सरकारला दिले आहेत. महाधिवक्ता देवेंद्रकुमार ऊपाध्याय आणि अमित बोरकर यांच्या खंडपीठाचे हे आदेश दिले आहेत. कोर्टाचा हा आदेश महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांना धक्का देणारा आहे. तरीही महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं तर राज्य सरकार आणि विरोधक यांच्यात तणाव वाढण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस
मुंबई हायकोर्टाच्या या आदेशानंतर आता मुंबईत पोलीस सतर्क झाले आहेत. पोलिसांकडून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना नोटीस जारी करण्यात येत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलीस लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे पोलिसांकडून कदाचित काही कार्यकर्त्यांची धरपकड देखील केली जाऊ शकते. तशी शक्यता नाकारता येत नाही. अर्थात या प्रकरणी काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आम्ही शांततेत आंदोलन करणार – पृथ्वीराज चव्हाण
दरम्यान, मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी लोकशाहीमध्ये आम्हाला आमचं म्हणण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आम्ही शांततेत आंदोलन करणार आहोत, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. चव्हाण यांच्या या प्रतिक्रियेवर काँग्रेस नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली. विरोधकांना आता राजकारण करायचं आहे. बदलापूरची घटना वाईट आहे. आरोपीवर कारवाई होत आहे. विशेष म्हणजे मुंबई हायकोर्टाने आदेश दिल्यानंतरही विरोधक त्या आदेशाला जुमानत नसल्याचा आरोप दरेकर यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरे यांचं महाराष्ट्र बंद विषयी नेमकं आवाहन काय?
“सर्वांना सांगतो उद्या दुपारी २ वाजेपर्यंत बंद कडकडीत पाळा. सरकारच्या कारभारावर चिंता व्यक्त करत आहोत हे सरकारला दाखवून द्या. काही पेपरमध्ये बातम्या आल्या आहेत. शाळेतील मुख्याध्यापिकेने प्रश्न केला की या जखमा सायकल चालवल्याने झाल्या असतील. कोर्टानेही काल बदलापूर प्रकरणावर ताशेरे ओढले आहेत. रोज घटना घडत आहे. १३ ऑगस्टला बदलापूर,. १५ पुणे, २० ऑगस्ट लातूर, नाशिक, पुणे, मुंबई, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये या घटना घडल्या आहेत. सरकारला आरसा दाखवत आहे. एवढं सर्व चालू असताना एवढं निर्ढावलेपणे बहिणीची किंमत पैशात करत असाल तर बहिणीच्या नात्याला कलंक लावू नका. बहिणीचं रक्षण करा. सुरक्षित बहीण फार महत्त्वाचं आहे. बातम्या वाचून संतापाचा कडेलोट होतोय”, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत मांडली.