Kishori pednekar : लोकांमध्ये आग लावण्याची आशिष शेलारांनी सुपारी घेतलीय, महापौरांचे सणसणीत प्रत्युत्तर
भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबईकरांना भरकटवण्याची सुपारी घेतली आहे. ही त्यांची पोटदुखी आहे, म्हणून ते आग लावण्याचे काम करत आहेत. अशा शब्दात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिलारांचा समाचार घेतला आहे.
मुंबई : 1 जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांसाठी एक मोठा निर्णय जाहीर केला. त्यांनी मुंबईतील 500 चौ. फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करत असल्याची घोषणा केली. त्यानंतर भाजप नेत्यांनी ही घोषणा आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केल्याची टीका केलीय. भाजप आमदार आशिष शेलार यांनी मालमत्ता कर माफीची आठवण ठाकरे सरकारला उशिरा का झाली? असा सवाल उपस्थित केलाय, शेलारांच्या या टीकेला महापौर किशोरी पेडणेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबईकरांना भरकटवण्याची शेलारांनी सुपारी घेतलीय
भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबईकरांना भरकटवण्याची सुपारी घेतली आहे. ही त्यांची पोटदुखी आहे, म्हणून ते आग लावण्याचे काम करत आहेत. अशा शब्दात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिलारांचा समाचार घेतला आहे. आपण मुंबईकरांना काहीतरी चांगले देतोय, भाजपकडे बोलायला काही राहिले नाही, म्हणून शेलार हे सर्व करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
आशिष शेलाय काय म्हणाले?
चार वर्षात मालमत्ता कर माफ का केला नाही? मुंबईकरांवरचे ठाकरे सरकारचे प्रेम हे बेगडी प्रेम आहे. बिल्डरांना 11 हजार कोटींची मदत केली, त्यावेळी कर माफीची आठवण का झाली नाही? असे अनेक प्रश्न शेलारांनी उपस्थित केले आहेत. दारू, रेस्टॉरंट यांना मदत केली त्यावेळी मालमत्ता कर माफीची आठवण का झाली नाही? 4 वर्षापूर्वी आपण मुंबईकरांना मालमत्ता करात माफ करत असल्याचे सांगितले त्यावेळेपासून लोकांना ही कर माफी द्यावी, अशी मागणीही शेलार यांनी केली. तसेच 4 वर्ष मालमत्ता कर वसूल केला तो मुंबईकरांना परत द्या. श्रीमंत लोकांचे ठीक आहे, पण मध्यम वर्गीयांनाही ठाकरे सरकार दिलासा देणार का? मुंबईतील दुकानदारांनाही ठाकरे सरकार मालमत्ता करात माफी देणार का? असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत. येत्या निवडणुकीत याचा सुपडा साफ होणार हे कळताच मालमत्ता कर माफ केले, असा टोला शेलार यांनी शिवसेनेला लगावला होता, त्यानंतर महापौरांनी आता त्यांना प्रत्युत्तर दिलंय.