Mumbai Local | रविवारच्या लोकल ट्रेनचं वेळापत्रक बघा, नाहीतर मनस्ताप होईल, उद्या तीनही मार्गावर मेगा ब्लॉक!
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रेल्वेच्या तीनही मार्गांवर रविवारी तब्बल पाच तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे. या मेगा ब्लॉकच्या दरम्यान अनेक लोकल गाड्या रद्द होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी घराबाहेर पडण्याआधी रेल्वेचं वेळापत्रक बघणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई | 12 ऑगस्ट 2023 : लोकल ट्रेनला मुंबईकरांची लाईफलाईन मानलं जातं. कारण लाखो मुंबईकर दररोज या लोकन ट्रेनने प्रवास करतात. चाकरमानी याच ट्रेनने दररोज आपलं कार्यालय गाठतात. त्यामुळे मुंबईकरांच्या मनात लोकल ट्रेनबद्दल एक हळवी जागा आहे. मुंबईकरांचं लोकल ट्रेनसोबत एक अनोखं नातं आहे. ऊन, पाऊस, थंडीत ही ट्रेन अविरतपणे, न थांबा सुरु असते. कधीतरी पाऊस जास्त पडला तर रेल्वे रुळावर पाणी थांबल्याने वाहतूक काही काळासाठी ठप्प होते. पण काही तासांनी पाणी ओसरल्यावर लोकल सेवा पुन्हा पूर्वरत होते. त्यामुळे प्रवाशांना हवं त्या ठिकाणी जाण्यास खूप मोठी मदत होते.
मुंबईकरांसाठी मुंबई लोकलबद्दल महत्त्वाची बातमी आहे. उद्या रविवारचा दिवस आहे. त्यामुळे जवळपास सर्वांना सुट्टी असते. सुट्टीच्या दिवशी अनेकजण घराबाहेर फिरायला पडतात. कुणी चौपाटीवर फिरायला जातं, तर कुणी वेगवेगळ्या नाट्यगृहांमध्ये नाटक पाहण्यासाठी जातं. कुणी वेगवेगळ्या पुस्तक प्रकाशनाच्या किंवा चित्र प्रकाशनाच्या कार्यक्रमाला जातं. तर कुणी आपल्या नातेवाईकांकडे जातं. पण फिरायला जाताना तुम्ही लोकल ट्रेनने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे.
मध्य रेल्वे मार्गावर पाच तासांचा मेगा ब्लॉक
मुंबईच्या तीनही रेल्वे मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक असणार आहे. रेल्वे विभागाकडून याबाबत अधिकृत माहिती जारी करण्यात आली आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. हा मेगा ब्लॉक सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यत असणार आहे. मध्य रेल्वेवरील या मेगा ब्लॉकच्या दरम्याव जलद मार्गावरील गाड्या धिम्या मार्गावर वळवण्यात येईल. या दरम्यान काही लोकल फेऱ्या रद्दद करण्यात येणार आहेत. तर काही लोकल गाड्या उशिराने धावणार आहेत.
सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेल लोकल फेऱ्या रद्द
हार्बर मार्गावर मानखुर्द ते नेरुळ दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी सव्वा अकरा ते दुपारी सव्वा चार वाजेपर्यंत मोगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे सीएसएमटी ते वाशी आणि सीएसएमटी ते बेलापूर आणि पनवेल दरम्यान धावणाऱ्या लोकल गाड्या अप आणि डाऊन या दोन्ही बाजूने रद्द राहणार आहेत. पण सीएसएमटी ते मानखुर्द दरम्यान विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावरही पाच तासांचा मेगा ब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूझ ते गोरेगाव अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यत ब्लॉक असणार आहे. या ब्लॉक दरम्यान धिम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गाने वळवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे विलेपार्ले आणि राम मंदिर रेल्वे स्थानकालर लोकल उपलब्ध राहणार नाहीत. बोरिवली ते गोरेगावदरम्यान काही लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.