मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी चांगली बातमी, म्हाडाच्या चार हजार घरांसाठी प्रक्रिया सुरु, कधी निघणार लॉटरी वाचा
mhada houses in mumbai : म्हाडाच्या ४०८३ सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात येणार आहे. यासाठी प्रक्रिया सुरु होत आहे. मोबाइल ॲपवरवरुन अर्ज करता येणार आहे. त्यासाठी जुलै महिन्यात लॉटरी काढण्यात येणार आहे.
मुंबई : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहप्रकल्पांतर्गत विविध उत्पन्न गटांसाठी ४०८३ सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात येणार आहे. यासाठी २२ मे २०२३ पासून अर्ज नोंदणी, ऑनलाईन अर्ज भरणे स्वीकृतीला दुपारी तीन वाजेपासून प्रारंभ होणार आहे. म्हाडाच्या घरांसाठी प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत १८ जुलै, २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात काढण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली.
मोबाइल ॲपवर अर्ज करता येणार
विक्रीकरिता उपलब्ध असलेल्या सर्व सदनिकांबाबत विस्तृत माहिती म्हाडाचे अधिकृत संकेत स्थळ https://housing.mhada.gov.in तसेच https://www.mhada.gov.in यावर प्रसिद्ध करण्यात आली आहे . ॲण्ड्रोइड मोबाइल फोनवर प्ले स्टोर आणि ॲपल मोबाइल फोनवर APP स्टोरमध्ये सोडत प्रणालीचे मोबाइल ॲप्लिकेशन MHADA HOUSING LOTTERY SYSTEM इच्छुक अर्जदारांकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहे.
ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक
सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्याकरिता सर्वप्रथम अर्जदारांनी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या पात्र अर्जदारांना अर्ज सादर करण्याकरिता २६ जून, २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्जासोबत आवश्यक असलेली उत्पन्न गट निहाय आवश्यक असलेली अनामत रक्कम क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंगद्वारे ऑनलाईन भरण्यासाठी २६ जून, २०२३ रोजी रात्री ११. ५९ वाजेपर्यंत मुदत असणार आहे. तसेच अनामत रकमेचा भरणा बँकेत आरटीजीएस, एनईएफटीद्वारे करण्यासाठी दि. २८ जून, २०२३ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत करता येणार आहे. सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी दि. ०४ जुलै, २०२३ रोजी दुपारी तीन वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in व https://www.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध केली जाणार आहे.
हरकती घेता येणार
प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाइन दावे अन् हरकती ०७ जुलै, २०२३ दुपारी तीन वाजेपर्यंत दाखल करता येणार आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी १२ जुलै, २०२३ रोजी दुपारी तीन वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध केली जाणार आहे.
कोणासाठी किती सदनिका
- मुंबई मंडळाच्या सोडतीत एकूण ४०८३ सदनिकांचा समावेश आहे.
- अत्यल्प उत्पन्न गटासाठी २७९०
- अल्प उत्पन्न गटासाठी १०३४
- मध्यम उत्पन्न गटासाठी १३९
- उच्च उत्पन्न गटासाठी १२० सदनिका
- अत्यल्प उत्पन्न गटात पहाडी गोरेगाव पश्चिम येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील १९४७, अॅन्टॉप हिलमधील ४१७ तर, विक्रोळीच्या कन्नमवार नगरमधील ४२४ अशी एकूण २७८८ सदनिका समाविष्ट आहेत.
- अल्प उत्पन्न गटात एकूण १०३४ सदनिका असून गोरेगावमधील पहाडी परिसरातील ७३६ सदनिकांचा त्यात समावेश आहे. उर्वरित सदनिका लोकमान्य नगर दादर, अँटॉप हिल वडाळा, सिद्धार्थनगर – गोरेगाव पश्चिम, डीएन नगर -अंधेरी, पंत नगर -घाटकोपर, कन्नमवार नगर विक्रोळी, चारकोप कांदिवली, महावीर नगर कांदिवली, जुने मागाठाणे बोरिवली, गव्हाणपाडा मुलुंड, पीएमजीपी मानखुर्द, मालवणी मालाड आदी ठिकाणची आहेत.
- मध्यम उत्पन्न गटासाठी मंडळाने १४० सदनिका उपलब्ध करून दिल्या असून या सदनिका उन्नतनगर गोरेगाव पश्चिम, महावीर नगर कांदिवली, जुहू, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, सहकार नगर चेंबुर, लोकमान्य नगर दादर, अँटॉप हिल वडाळा, भायखळा, टिळकनगर चेंबुर, चांदिवली पवई, गायकवाड नगर मालाड, प्रतीक्षा नगर सायन, चारकोप कांदिवली येथे आहेत.
- उच्च उत्पन्न गटासाठी १२० सदनिकांचा समावेश असून या सदनिका जुहू अंधेरी पश्चिम, वडाळा पश्चिम, ताडदेव, लोअर परळ, शिंपोली कांदिवली, तुंगा पवई, चारकोप कांदिवली, सायन पूर्व येथे आहेत.
किती हवे उत्पन्न
- अत्यल्प उत्पन्न गटाकरिता (EWS) वार्षिक सहा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न आवश्यक आहे.
- अल्प उत्पन्न गटाकरिता (LIG) वार्षिक नऊ लाख रुपयापर्यंत उत्पन्न आवश्यक आहे.
- मध्यम उत्पन्न गटाकरिता (MIG) बारा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न आवश्यक आहे.
- उच्च उत्पन्न गटाकरिता (HIG) कमाल उत्पन्न मर्यादा नाही.
प्रधानमंत्री आवास योजनेतील सदनिकांची किंमत ही केंद्र व राज्य शासनाचे प्रती सदनिका एकूण अनुदान अडीच लाख रुपये वजा करून निश्चित करण्यात आली आहे.
कोणीही सल्लागार किंवा दलाल नाही
सदनिका विक्रीसाठी म्हाडाने कार्य प्रणाली निश्चित केली आहे. मंडळाने सदनिकांच्या विक्री करिता किंवा तत्सम कोणत्याही कामासाठी कोणालाही प्रतींनिधी/ सल्लागार/ प्रॉपर्टि एजेंट/ मध्यस्थ/ दलाल म्हणून नेमलेले नाही अर्जदारांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी परस्पर आर्थिक व्यवहार करू नये आणि तसे केल्यास मंडळ अथवा म्हाडा प्रशासन जवाबदार राहणार नाही.