ठाकरे गटाच्या अडचणी वाढवणारी बातमी, संजय राऊत यांच्या धाकट्या भावाला नोटीस
तपास यंत्रणांचा चौकशीचा ससेमिरा आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचला आहे. संजय राऊत यांच्या धाकट्या भावाला आर्थिक गुन्हे शाखेकडून नोटीस बजावण्यात आलीय. त्यामुळे ठाकरे गटात खळबळ उडाल्याची माहिती समोर आलीय.
कृष्णा सोनारवाडकर, Tv9 मराठी, मुंबई | 5 ऑक्टोबर 2023 : ठाकरे गटाच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीयत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना अटक झाली होती. त्यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली होती. राऊत हे तब्बल दोन महिने जेलमध्ये होते. त्यांना दोन महिन्यांनी कोर्टातून जामीन मिळाल्यानंतर त्यांची जेलमधून सुटका झाली. त्यानंतर संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना ईडीकडून अटक करण्यात आली. कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात सुजीत पाटकर यांना अटक करण्यात आली. यादरम्यानच्या काळात युवासेनाचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांचीदेखील चौकशी करण्यात आलीय. आता या चौकशीचा ससेमिरा संजय राऊत यांच्या घरापर्यंत येऊन ठेपला आहे.
आर्थिक गुन्हे शाखेकडून संजय राऊत यांच्या धाकट्या भावाला नोटीस पाठवण्यात आलीय. आर्थिक गुन्हे शाखेने संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांना नोटीस पाठवली आहे. खिडची घोटाळा प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संदीप राऊत यांना उद्या सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश देण्यात आलाय. त्यामुळे ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
कोरोना काळातील कोविड घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरु आहे. याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकर यांची चौकशी करण्यात आली आहे. याशिवाय आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांचाही जबाब याप्रकरणी नोंदवण्यात आला आहे. मात्र आता या प्रकरणाचा तपास ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचताना दिसतोय. कारण संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांना सुद्धा याप्रकरणी समन्स बजावण्यात आलाय.
संदीप राऊत यांचा या प्रकरणात नेमका रोल काय होता, ते समजू शकलेलं नाही. राजकीय ओळख आणि ताकदीचा वापर करुन कंत्राट देण्यात आल्याचा आरोप याप्रकरणी करण्यात आलाय. आता आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासातून काय माहिती समोर येते ते आगामी काळात स्पष्ट होईल.