कहाणी मुंबईच्या वडापावची, कोण आहे वडापावचा जनक, कसा ‘लोकल टू ग्लोबल’ बनला वडापाव

world vada pav day 2024: मुंबईतून वडापाव जगभर पसरला. सचिन तेंडुलकरपासून नितीन गडकरीपर्यंत सर्वांना आवडणाऱ्या या वडापावची उगमकथा काय आहे? सर्वात आधी वडापाव कुठे आणि केव्हा बनवला गेला? मुंबईतून जगभर कसा पसरला वडापाव? पाहू या वडापावसंदर्भात सर्व काही...

कहाणी मुंबईच्या वडापावची, कोण आहे वडापावचा जनक, कसा 'लोकल टू ग्लोबल' बनला वडापाव
वडापाव
Follow us
| Updated on: Aug 23, 2024 | 2:42 PM

स्वस्त आणि खाण्यास सोयीस्कर… भूक लागल्यानंतर पटकन सर्वत्र सहज मिळणारा… खमंग, झणझणीत पदार्थ म्हणजे वडापाव… खवय्यांच्या जीभेला पाणी सोडणारा मुंबईचा स्ट्रीट फूड असलेला वडापाव ‘लोकल टू ग्लोबल’ झाला आहे. महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीमध्ये वडापाव अविभाज्य घटक झाला आहे. सेलिब्रिटी असो की सर्वसामान्य सर्वांचा आवडता खाद्यपदार्थ म्हणून वडापावने मान्यता मिळावली आहे. मॅकडॉनाल्डच्या बड्या स्टोअरमधील बर्गरपेक्षा हे भारतीय बर्गर वडापाव महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात प्रसिद्ध झाला आहे. त्याची ओळख देशभरात नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर झाली आहे. आतातर सात समुद्रापार वडापाव मिळू लागला आहे. यामुळेच 23 ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक वडापाव दिवस’ म्हणून साजरा केला जातो. मग या वडापावची उगमकथा काय आहे? सर्वात आधी वडापाव कुठे आणि केव्हा बनवला गेला? मुंबईतून जगभर कसा पसरला वडापाव? पाहू या वडापावसंदर्भात सर्व काही…

मुंबईत असा जन्माला आला वडापाव

मुंबईतील दादर, लालबाग, परळ आणि गिरगाव येथील गिरणी कामगार अन् वडापाव यांचे विशेष नाते आहेत. वडापावच्या शोधाचे श्रेय जाते मुंबईकर अशोक वैद्य यांना. अशोक वैद्य यांनी दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर वडा आणि पोहा स्टॉल सुरु केला होता. त्या दुकानातून अनेक दिवस ते बटाटे वडा विकत होते. एके दिवशी दुकानात विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थात थोडा वेगळा प्रयोग करण्याची त्यांची इच्छा झाली. त्यामुळे त्यांनी शेजारच्या दुकानातून पाव आणले. त्या पावला चाकूने कापून त्यात चटणी भरली. त्यात वडा ठेऊन लोकांना देणे सुरु केले. लोकांना त्याची चव आवडली. त्यांचा हा प्रयोग म्हणजे वडापावचा जन्म आहे. म्हणजेच 1966 दादर रेल्वे स्टेशनजवळ अशोक वैद्य यांच्या एका छोट्या दुकानात वडापावचा जन्म झाला. मग हा वडापाव अल्पवधीतच मुंबईतील लोकप्रिय खाद्यपदार्थ बनला. त्यानंतर संपूर्ण राज्यात पसरला. 1998 मध्ये अशोक वैद्य यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा मुलगा नरेंद्र वैद्य यांनी वडापावचा व्यवसाय सांभाळला.

हे सुद्धा वाचा

अशोक वैद्य वडापावचे जनक

बाळासाहेब ठाकरेसुद्धा होते अशोक वैद्य यांच्या वडापावचे चाहते

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सुद्धा अशोक वैद्य यांच्याकडून वडापाव घेऊन खात होते. या दोघांमध्ये चांगली मैत्री होती. बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वैद्य यांना त्रास न देण्याचे बजावले होते. मुंबईतील अनेक गिरण्या 1970 ते 1980 या काळात झालेल्या संपामुळे बंद पडल्या. यामुळे रोजगार नसलेल्या लोकांनी वडापावचे स्टॉल्स सुरु केले होते. या युवकांना शिवसेनेकडून प्रोत्साहन आणि पाठिंबा मिळत होता. तसेच शिवसेना कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या सभांमध्ये वडापाव खाण्यासाठी दिले जात होते.

शिवसेनेकडून वडापावचे राजकीय ब्रॅण्डींग

शिवसेनेची सुरुवात दक्षिण भारतीयांना विरोध आणि मराठी माणसांचे हक्क या मुद्यावर झाली. मुंबईत शिवसेनेने दक्षिण भारतीयांविरुद्ध भूमिका घेतली. त्यामुळे मुंबईमधील दादर, माटुंगा या भागात उडपी हॉटेल्समधील दाक्षिणात्य खाद्यपदार्थांवर बहिष्कार आंदोलन सुरु झाले. दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांऐवजी शिवसेनेने वडापावचे प्रमोशन करणे सुरु केले. उडप्यांचे पदार्थ खाण्याऐवजी मराठमोळा वडापाव खा, अशी घोषणा करत वडापावचे राजकीय ब्रॅण्डींग शिवसेनेने केले. शिवसेनेचा ‘शिववडा’ हा त्याचमुळे जन्माला आला. अनेक शिवसैनिकांनी त्यावेळी वडापावची दुकाने टाकली होती.

वडापावचे प्रकार

बदल्या काळानुसार वडापावमध्ये बदल सुरु झाले. सध्याच्या युवा पिढीला चीजची आवड आहे. ज्या पद्धतीने बर्गरमध्ये चीज वापरला जातो, त्या पद्धतीने वडापावमध्ये देखील चीजचा वापर सुरु झाला. त्यामुळे चीज बर्स्ट वडापाव आला. त्यासोबत हळूहळू नाचो वडापाव, शेजवान वडापाव, मसाला वडापाव, स्वीटकॉर्न वडापाव, मेयोनिज वडापावसारखे भन्नाट कॉम्बिनेश्न आले. हे नवीन प्रकार खवय्यांच्या जीभेचे चोचले पुरवू लागले. मग हळहळू वडापावसुद्धा एक ब्रँण्ड होऊ लागला. त्यामुळे मिनी, नॉर्मल आणि जम्बो असे प्रकार मिळू लागले. साधा ब्रेड आणि ब्राऊन ब्रेड प्रकारातही वडापाव मिळू लागला. 1990 मध्ये अमेरिकन फास्ट फूड चेन मॅक्डॉनल्ड कंपनी भारतात आली. तिची देशात अनेक ठिकाणी स्टोअर उघडली. भारतात मॅक्डॉनल्ड लोकप्रियता वाढत होती. मग ही घटना वडापावचा ब्रॅण्ड सुरु करण्यासाठी फायदेशीर ठरली.

धीरज गुप्ता

असे आले वडापावचे ब्रॅण्ड

एमबीए झालेले धीरज गुप्ता यांनी जॉन एफ लव यांच्या ‘मॅकडॉनल्ड्स : बिहाइंड द आर्चेस’ पुस्तक वाचले. त्या पुस्तकापासून प्रेरणा घेऊन त्यांनी वडापावचे दुकान सुरु केले. त्यांच्या या निर्णयास घरातून विरोध झाला होता. परंतु त्यानंतर मुंबईतील मलाडमध्ये सन 2000 मध्ये त्यांनी ‘जम्बोकिंग’ वडापाव हे पहिले दुकान सुरु केले. 2003 मध्ये कांदिवलीमध्ये दुसरे आउटलेट उघडले. मग पुढे 2005 मध्ये आणखी पाच आउटलेट सुरु केले. 2006 मध्ये त्यांनी राज्याबाहेर विस्तार केला. गुजरातमधील सुरतमध्ये आउटलेट सुरु केले. परंतु पॅटीजची वाहतूक करणे व्यवहार्य नसल्यामुळे आणि गुणवत्तेशी तडजोड करता येणार नसल्यामुळे लवकरच हे आउटलेट बंद केले. 2009 पर्यंत त्यांचे 38 आउटलेट उघडले गेले होते. आता मुंबई, दिल्ली, पुणे, हैदराबादमध्ये त्यांचे 170 स्टोअर्स झाले आहे. त्यांची कंपनीची उलाढल 110 कोटींवर गेली आहे. त्यांनी वडापावची भारतीय बर्गर म्हणून त्यांनी जाहिरात केली. आज वडापावच्या अनेकांनी चेन तयार केल्या आहेत. महाराष्ट्रीयन वडापावला ब्रँड व्हॅल्यू देण्याचे काम त्यांनी केले आहे. पुढे व्यंकटेश अय्यर यांनी वडापावचे ब्रॅण्डींग केले. त्यांनी 2004 मध्ये गोली वडापाव सुरु केले. ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये गोली वडापावचे पहिले आउटलेट सुरू केले गेले. त्यात पनीर वडापाव, शेजवान, मिक्स व्हेज, पालक मका असे अनोखे प्रकार खवय्यांना मिळतात. देशभरात त्यांचे 350 आउटलेट्स आहेत.

ठाण्यातील ट्रॅफिक वडापाव

ट्रॅफिक वडापाव आहे काय प्रकार?

ट्रॅफिक वडापाव हा नवीन प्रकार ठाण्यातून समोर आला. ठाणेकर असलेल्या गौरव लोंढे यांनी ट्रॅफिक वडापाव सुरु केले आहे. त्यांना ही कल्पना कशी सुचली? त्याचेही भन्नाट गोष्ट आहे. सन 2019 मध्ये ते स्वत: वाहतुकीत अडकले होते. त्यांना जाम भूक लागली होती. यामुळेच वाहतूक कोंडीत वडापाव विकण्याची संकल्पना त्यांना सुचली. मग त्यांनी खासगी कंपनीत असलेली मॅनेजरची नोकरी सोडली अन् वडापावचे दुकान थाटले. वाहतुकीत आणि सिग्नलमध्ये अडकलेल्या लोकांना ते वडापाव देतात. त्यांचे ठाण्यातील तीन हाथ नाक्यावर दुकान आहे. सुरुवातील त्यांच्याकडे पाच डिलेव्हरी बॉय होते. आता ती संख्या वाढली आहे. वडापावच्या या संकल्पनेतून ते महिन्याला दोन लाख रुपये कमवत आहेत.

सचिन तेंडुलकर वडापावचा चाहता

सचिन तेंडुलकरपासून गडकरीपर्यंत सर्वच वडापावचे चाहते

स्ट्रीट फूड म्हटला जाणाऱ्या वडापावच्या प्रेमात सामान्य लोकच नाही तर सेलिब्रेटीजसुद्धा आहे. महान क्रिकेटपटू आणि मुंबईकर असलेल्या सचिन तेंडुलकर याच्यासाठी वडापाव म्हणजे जीव की प्राण आहे. मुंबईकर असल्यामुळे सचिन तेंडुलकर याचे वडाप्रेम प्रेम सर्वांना चांगलेच माहीत आहे. एका मुलाखतीत सचिन तेंडुलकर याने वडापाव आपला विकपाईंट असल्याचे म्हटले होते. शिवाजी पार्क मैदानात खेळून आल्यावर सचिन तेंडुलकर वडापाववर ताव मारत होता. सचिन आणि त्याचा बालमित्र विनोद कांबळी हे वडापाव खाण्याची स्पर्धा करत होते. सचिनप्रमाणे मुंबईकर रोहित शर्मा यालादेखील वडापाव चांगलाच भावतो. राजकीय लोकांमध्ये वडापावचे चाहते सर्वच आहे. परंतु खवय्यगिरीसाठी प्रसिद्ध असलेले भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे वडापाववर विशेष प्रेम आहे.

वडापाव सात समुद्रापार विदेशातही

2015मध्ये, दिग्दर्शक अलमबयान सिद्धार्थ यांनी पाच मिनिटांचा वडापाव इंक नावाचा लघुपट बनवला. त्यात वडापावची गोष्ट सांगितले. आता वडापाव हा विषय घेऊन त्यावर पीएचडी केल्याचे सांगितल्यावर तुम्हाला धक्का बसले आणि ही पीएचडी भारतात नाही तर चक्क अमेरिकेत केली गेली आहे. अमेरिकेमधील ऱ्होड आयलंडमधील ब्राऊन विद्यापीठात वडापाववर पीएचडीचा प्रबंध सादर झाला. हॅरिस सॉलोमन या विद्यार्थ्याच्या या शोधप्रबंधाला मान्यता देऊन त्याला पीएचडी पदवी मिळाली आहे. अमेरिकेनंतर लंडनमध्ये वडापाव प्रसिद्ध झाला. मुंबईकर असलेले सुजय सोहनी (ठाणे) आणि सुबोध जोशी (वडाळा) यांनी वडापावला लंडनमध्ये नेले. त्या दोघांनी लंडनमध्ये श्रीकृष्ण वडापाव नावाचे हॉटेल 2010 मध्ये टाकले. मग इंग्रजांनाही या खाद्यपदार्थाची भुरळ पडली. आता सोहनी आणि जोशी यांची या उद्योगातून वार्षिक उलाढाल चार कोटींहून अधिक आहे.

वडापाव जागतिक यादीत

वडापाव गर्ल फेमस झाली अन् बिग बॉसमध्ये

दिल्लीतील वडापाव गर्ल चंद्रिका दीक्षित हिला मुंबईतील वडापावने बिग बॉस ओटीटीमध्ये पाठवले आहे. दिल्लीत तिचा वडापाव खाण्यासाठी लांबच्या लांब रांगा असतात. सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रीय असते. सोशल मीडियावर तिचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. मी प्युअर मुंबई स्टाईल वडापाव देते, असे ती सांगत असते. नोकरी करणाऱ्या चंद्रिक दीक्षित हिने वडापावची विक्री कशी सुरु केली? त्यासाठी कौटुंबिक कारण आहे. चंद्रिकाचा लहान मुलगा आजारी पडला होता. त्यामुळे तिने हल्दीराम कंपनीतील नोकरी सोडून वडापावचा व्यवसाय सुरु केला. या व्यवसायात तिला चांगले यश मिळाले. सोशल मीडियामुळे डॉली चहावाल्यासारखी ती देशभर प्रसिद्ध झाली. आता वडापाव विकून ती रोज 40 हजार रुपये कमवत असल्याचे म्हटले जाते. तसेच सोशल मीडियातूनही तिला वेगळे पैसे मिळत असतात.

जागतिक स्नॅक्सच्या यादीत वडापाव

वडापावला जागतिक ओळख मिळाल्यामुळे प्रसिद्ध फूड अँड ट्रॅव्हल गाईड टेस्ट अ‍ॅटलसच्या यादीत मुंबईच्या वडापावला स्थान मिळाले आहे. 2024 च्या या यादीतील टॉप-50 बेस्ट सँडविचमध्ये वडापाव आहे. यादीत 19 व्या क्रमांक वडापावला मिळला आहे. टेस्ट अ‍ॅटलसकडून दरवर्षी अशी यादी सादर केली जाते. वडापाव हा एक लोकप्रिय आणि सर्वांना परवडणारा नाश्ता आहे. मुंबईत अनेक जण वडापाव खाऊन आपला दिवस घालवतात.

मुंबई आणि वडापावचे नाते अतूट आहे. यामुळे मुंबईकरांची पावले प्रसिद्ध वडापावच्या दुकानांकडे नेहमीच वळत असतात. मग दादर येथील श्रीकृष्णा वडापाव, मामा काणे यांचा वडापाव, किर्ती कॉलेजचा वडापाव आणि सीएसएमटी स्टेशन जवळील आराम वडापाव, फोर्टच्या सीटीओजवळ मिळणारा वडापाव, ठाणे स्टेशन येथील कुंजविहारचा वडा पाव असे अनेक वडापावची नावे प्रसिद्ध आहे. ही यादी न संपणारी आहे. प्रत्येकाचे वेगळे वैशिष्ट आणि वेगळी चव आहे. कीर्ती कॉलेजबाहेरच्या वडापाववाल्याने वड्याबरोबर बेसनाचा चुरा देण्यास प्रारंभ केला. मग ठाण्यातील कुंजविहारने मोठ्या पाव सोबत वडा असा प्रयोग राबवला. ठाण्यातील गजानन वडापाव बेसनाच्या पिवळ्या चटणीमुळे प्रसिद्ध झाला. मग कल्याणमध्ये वझे कुटुंब वडापाव खिडकीमधून देत होते. यामुळे त्याला खिडकी वडापाव म्हटले जाऊ लागले. यावरुन वडापाव ठिकठिकाणी विविध पद्धतीने लोकांच्या पसंतीस उतरल्याचे दिसून येते.

मुंबईतील हे वडापाव खाल्ले का?

  • अशोक वडापाव किंवा किर्ती कॉलेज वडापाव (1983 पासून)

कुठे मिळतो – किर्ती कॉलेजजवळ, दादर (पूर्व)

  • ग्रॅज्युएट वडापाव

कुठे मिळतो- भायखळा स्टेशनच्या जवळ

  • आनंद वडापाव

कुठे मिळतो- विलेपार्ले भागातील मिठीबाई कॉलेजजवळ

  • अशोक साटम वडापाव (सीटीओ वडापाव)

कुठे मिळतो – महात्मा गांधी रोड, सेंट्रल टेलिग्राफ ऑफिसजवळ, आझाद मैदान, फोर्ट (मुंबई)

वडापाव जन्माच्या वेळी त्याची किंमत केवळ १० पैसे होती. आज अगदी दहा रुपयांपासून मॉलमध्ये 80 ते 100 रुपयांपर्यंत वडापाव मिळतो. सध्या इंटरनेटचा जमाना आहे. यामुळेच आपल्या शहरातील लोकप्रिय वडापाव स्टॉलचे पत्ते सांगणारे विशेष नकाशेही गुगल मॅप्सवर आहेत. ऑनलाईनचे युग आहे. घरी बसून झोमॅटो अन् स्विगीवरुन खाद्यपदार्थ मागवणारे मुंबईकर वडापावची ऑर्डर या प्लॅटफार्मवर देतात. परंतु वडापाव घरी बसून खाण्यापेक्षा रस्त्यावरील गाडीवर किंवा प्रत्यक्षात स्टॉलवर जाऊन खाण्यातील मज्जा काही वेगळीच आहे.

250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.