उर्फी जावेद हिला लालबागचा राजा मंडळाची VVIP ट्रीटमेंट, डबेवाले भडकले; मोठी मागणी काय?
लालबागचा राजाच्या दर्शनासाठी रोज हजारो लोक येत आहेत. रंकापासून रावापर्यंत ते सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपासून सर्वच बाप्पाच्या दरबारात हजेरी लावत आहेत. तास न् तास रांगेत उभं राहून बाप्पाचं दर्शन घेत आहेत.
मुंबई | 24 सप्टेंबर 2023 : गेल्या सहा दिवसांपासून राज्यात गणेशोत्सव दणक्यात साजरा केला जात आहे. अनेक मंडळांच्या मंडपांमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. या गर्दीला आवरण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भाविकही शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेत आहेत. मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा मंडळालाही रोज गर्दी वाढताना दिसत आहे. लालबागचा राजाचं दर्शन घेण्यासाठी कर्जत-कसाऱ्याहून सर्वसामान्य भाविक येत आहेत. एवढेच नव्हे तर राजकारणी आणि सेलिब्रिटीही येत आहे. त्यामुळे व्हीव्हीआयपींसाठी दर्शनासाठी वेगळी रांग करण्यात आली आहे. मात्र, या रांगेतून प्रसिद्ध मॉडेल उर्फी जावेद हिला प्रवेश देण्यात आल्याने एकच गोंधळ निर्माण झाला आहे. मुंबई डबेवाला असोसिएशनने यावरून प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
उर्फी जावेदला व्हीव्हीआयपी गेटमधून लालबागचा राजाच्या दर्शनासाठी प्रवेश देण्यात आला. तिच्या हस्ते लालबागचा राजाची आरतीही करण्यात आली. त्यामुळे डबेवाला असोसिएशनने संताप व्यक्त केला आहे. गणेश भक्तांना रात्र रात्र जागून रांगेत उभं राहावं लागतंय. भर पावसात गणेश भक्त रांगेत उभे राहत आहेत. आणि काही लोकांना व्हीव्हीआयपीच्या नावाखाली थेट बाप्पाचं दर्शन दिलं जात आहे हे चुकीचं आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी व्यक्त केली आहे.
उर्फीचं योगदान काय?
सर्वात वाईट गोष्ट म्हणजे उर्फी जावेदला थेट बाप्पाचं दर्शन देण्यात आलं आहे. हे निश्चितच खटकणारे आहे. उर्फीला थेट व्हीव्हीआयापी रांगेतून दिलं, उर्फीचं देशासाठी आणि समाजासाठी असं काय योगदान आहे की तिला थेट दर्शन दिलं गेलं? असा सवाल डबेवाल्यांनी केलं आहे. लालबागचा राजा मंडळाकडून भक्तांमध्येच हा भेदभाव का केला जात आहे? उर्फी सारख्या लोकांनाही व्हीव्हीआयपी रांगेतून थेट दर्शन मिळत असेल तर हे व्हीव्हीआयपी दर्शनच बंद करा, अशी संतप्त मागणीही डबेवाल्यांनी केली आहे.
चाहत्यांना धक्का
दरम्यान उर्फीने टीव्ही स्टार प्रतीक सेहजपाल यांच्यासोबत लालबागचा राजाचे दर्शन घेतलं. यावेळी उर्फीने तोंडाला मास्क लावला होता. त्यामुळे लोकांनी उर्फीला चांगलंच ट्रोल केलं. उर्फी बेबी पिंक कलरचा आऊटफिट घालून गेली होती. बाप्पाचं दर्शन घेताना तिने डोक्यावर दुप्पटा घेतला होता. तिने बाप्पाची आरतीही केली. त्यानंतर तिने मीडियालाही पोझ दिल्या. मंडपात तिने बाप्पाचा प्रसादही घेतला. उर्फीला पहिल्यांदाच पूर्ण कपड्यात आणि भक्तीभावात रंगलेलं पाहून तिच्या चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.