नारायण राणे, नितेश राणेंना 10 मार्चपर्यंत दिलासा, दिंडोशी न्यायालयाचे मुंबई पोलिसांना महत्त्वाचे आदेश
दिशा सालियान संदर्भात वक्तव्य केल्यामुळं नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात मालवणी पोलीस स्टेशनला एफआयर दाखल झाला होता.
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर (Shivsena) हल्लाबोल केला होता. त्या पत्रकार परिषदेत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) देखील उपस्थित होते. दिशा सालियान आत्महत्येप्रकरणी वक्तव्य केल्यामुळं नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात मालवणी पोलीस स्टेशनला एफआयर दाखल झाला होता. नारायण राणे आणि नितेश राणे यांनी यानंतर अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. दिंडोशी न्यायालयानं आज नारायण राणे आणि नितेश राणे यांना दिलासा दिला आहे. मालवणी पोलिसांनी अटकेची कारवाई 10 मार्चपर्यंत करु नये, अशा सूचना दिंडोशी न्यायालयानं दिल्या आहेत. नारायण राणे आणि नितेश राणे आता मालवणी पोलीस स्टेशनला उपस्थित राहून त्यांची बाजू मांडू शकतात.
ट्विट
Relief for Union Min #NarayanRane & #NitishRane in Malwani FIR after #MumbaiPolice undertakes not to arrest them till March 10, 2022.The police accused them of spreading false info about late actor #SushantSinghRajput’s former manager, #DishaSalian’s death. pic.twitter.com/OX67yqmwV1
— Live Law (@LiveLawIndia) March 4, 2022
नारायण राणे त्यांची बाजू मांडणार
मालवणी पोलीस स्टेशनला नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या विरोधात तक्रार दाखळ झाली आहे. त्यावर नारायण राणे आणि नितेश राणे त्यांची बाजू पोलिसांसमोर मांडणार आहेत. 5 मार्चला नारायण राणे त्यांची बाजू मांडण्याची शक्यता आहे.
नेमकं प्रकरण काय?
राणे पितापुत्रांवर मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता . दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार करून हत्या झाली आहे. ती गरोदरही होती, असा दावा नारायण राणे यांनी केला होता. त्यावर सालियन कुटुंबीयांनी आक्षेप घेतला होता. तसेच आमच्या मुलीची बदनामी थांबवा असं आवाहनही केलं होतं. त्यानंतर सालियन कुटुंबीयांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणी सालियन कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाकडेही दाद मागितली होती. त्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलिसांकडून दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा अहवाल मागितला होता.
दिशाची बदनामी थांबवा, पालकांची विनंती
नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या परत परत आरोप करण्यामुळे दिशा सॅलियनची मृत्युनंतर बदनामी होत आहे, असा आरोप शिवसेनेकडून सतत करण्यात येतो.मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबाबत महिला आयोगाकडेही तक्रार केली होती. त्यावरून भाजप आणि शिवसेनेत अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते. दिशा सालियनच्या पालकांनीही माध्यमांसमोर येत आपली बाजू मांडली होती. आणि दिशाची बदनामी थांबवण्याची विनंती त्यांनी केली होती.
इतर बातम्या:
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या सत्रात काय घडलं? पाहा फोटोस्टोरी
Aurangabad | रनवेवर खोकड अन् विमान हवेतच गोल गोल, औरंगाबादेत लँडिंग करताना विचित्र खोडा