रात्रीस राजकीय खेळ चाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी हालचाली, ठाकरे गटाला पुन्हा झटका
नाशिकच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलीय.
सुमेध साळवे, मुंबई : चार महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप आला होता. त्या राजकीय भूकंपातून शिवसेनेचा ठाकरे गट सावरत असताना शिंदे गटाकडून धक्क्यावर धक्के सुरुच आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी 40 आमदारांना घेऊन आधी बंडखोरी केली आणि भाजपची साथ घेऊन सरकार स्थापन केलं. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदारही फोडले. हजारो कार्यकर्त्यांना सामील करुन घेतलं. शिंदे गटाचं हे काम अजूनही सुरुय. विशेष म्हणजे चार महिन्यांपूर्वी जसं रातोरात महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आला होता. तसंच आता नाशिक शहराच्या राजकारणात भूकंप येण्याची दाट शक्यता आहे.
नाशिकच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलीय. नाशिकच्या आगामी महापालिका निवडणुकीआधीच शिवसेनेच्या शिंदे गटाने ठाकरे गटाला धक्का देण्याचा बेत आखला आहे.
विशेष म्हणजे नाशिकच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. या घडामोडी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानातून घडत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
नाशिकमधला माजी नगरसेवकांचा एक मोठा गट शिंदे गटात प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे हा पक्षप्रवेश पुढच्या काही क्षणात होण्याची दाट शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गट ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठं खिंड्डार पाडण्याचा तयारीत आहे. ठाकरे गटाचे 15 ते 17 माजी नगरसेवक बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत ‘वर्षा’ निवासस्थानी या सर्व माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर आलीय. या पक्षप्रवेशासाठी माजी नगरसेवक ‘वर्षा’वर दाखल झाले आहेत.