ठाकरे गटाला डिवचण्यासाठी नवनीत राणा यांचे थेट ‘मातोश्री’बाहेर बॅनर, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठ्या घडामोडींचे संकेत?
ठाकरे गटाला डिवचण्यासाठी खासदार नवनीत राणा यांचे बॅनर उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानाबाहेर लावण्यात आले आहेत. नवनीत राणा यांनी याआधी 'मातोश्री' बाहेर हनुमान चालीसाचं पठण करुन आंदोलन करण्याचा इशारा दिला तेव्हा मोठ्या राजकीय घडामोडी बघायला मिळाल्या होत्या.
मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana), त्याचे पती रवी राणा (Ravi Rana) आणि शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गट यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. कारण खासदार नवनीत राणा यांच्या समर्थकांनी थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर बॅनरबाजी केली आहे. या बॅनरवर नवनीत राणा यांचा ‘हिंदू शेरणी’ असा उल्लेख करण्यात आलाय. ‘जो प्रभू श्रीराम का नही, वो किसी काम का नही’, असं बॅनरवर लिहिण्यात आलं आहे. या बॅनरच्या माध्यमातून नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा लगावलाय.
“उद्धव ठाकरे सरकारने हनुमान चालीसा पठणाला विरोध केला. हनुमान चालीसा वाचल्याबद्दल खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आणि 14 दिवस जेलमध्ये ठेवलं”, असं संबंधित बॅनरवर लिहिण्यात आलं आहे. याशिवाय येत्या 6 एप्रिलला राणा दाम्पत्य हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं देखील म्हटलं आहे. याबाबत ठाकरे गटाकडून खासदार विनायक राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
विनायक राऊत काय म्हणाले?
नवनीत राणांच्या बॅनरवर खासदार विनायक राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “ठिक आहे. मी आता त्या विषयावर काही बोलत नाही. पण ज्यांना अवदासा आठवली आहे त्यांनी अशाप्रकारचं वक्तव्य करावं, असं मी त्यांना सांगेन”, असा इशारा विनायक राऊत यांनी दिला.
रवी राणा यांची टीका
“राज्याची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अहंकारातून ज्या पद्धतीने हनुमान चालीसाचं पठण करतो म्हणून राजद्रोहाचा गुन्हा दाखल करुन आम्हाला 14 दिवस जेलमध्ये टाकलं. उद्धव ठाकरेंनी हनुमान चालीसाला विरोध केला. प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादानेच हनुमान जयंतीच्या दिवसीच नवनीत राणा यांचा वाढदिवस येतो. संपूर्ण अयोध्या असो, दिल्ली, नागपूर, मुंबई, पुणे किंवा संपूर्ण देशात हनुमान चालीसा ट्रस्टच्या वतीने नवनीत राणा यांचं बॅनर लावला जातोय. त्यांचा उल्लेख हिंदू शेरणी असा केला जातोय”, असं रवी राणा म्हणाले आहेत.
“बजरंग बलीचा विरोध करुन उद्धव ठाकरे यांचं धनुष्यबाण गेलं. सरकार गेलं, 40 आमदार गेले आणि स्वत:चं मुख्यमंत्री पदही गेलं. ज्यांनी रामाला, हनुमान चालीसाला विरोध केला त्यांचं पूर्ण साम्राज्य नष्ट झालेलं आहे. हे उद्धव ठाकरेंच्या रुपाने आम्ही पाहिलेलं आहे. हनुमान चालीसाचं पठण श्रीराम भक्त आणि हनुमान भक्त करणार आहेत. हे पठण इतक्या जोरात असणार आहे की हनुमान चालीसाचा आवाज मातोश्रीपर्यंत गुंजणार आहे”, अशा शब्दांत रवी राणा यांनी टीका केलीय.