मविआच्या बैठकीत खलबतं काय? जयंत पाटील यांनी आतली बातमी सांगितली
महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलीय. मविआच्या गोटात सध्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. त्याचबद्दल त्यांनी महत्त्वाची माहिती दिली.
मुंबई : महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) गोटात सध्या महत्त्वाच्या घडामोडी घडत आहे. राज्यात सत्तांतर होऊन आता आठ महिने होत आली आहेत. या आठ महिन्यांत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भरपूर काही गमवावं लागलं आहे. तर महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना सत्ता गमवावी लागली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि विशेषत: शिवसेनेला बसलेली झळ कधीही भरुन न निघण्यासारखी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा भाजप आणि सध्याच्या शिवसेनेविरोधातील संताप हा शब्दांमधून व्यक्त करता येणार नाही असाच आहे. हा संताप महाविकास आघाडीचे नेते आपल्या आक्रमक भाषणांमधून व्यक्त करणार आहेत. त्यासाठीच महाविकास आघाडीच्या गोटात हालचालींना वेग आलाय.
महाविकास आघाडीच्या नेत्यांची आजदेखील महत्त्वाची बैठक पार पडली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या ‘अजिंक्यतारा’ या शासकीय निवासस्थानी महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. या बैठकीत नेमकं कोणकोणत्या मुद्द्यांवर खलबतं झाली याबाबतची माहिती स्वत: जयंत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे-भाजप यांच्यातील संघर्ष किती तीव्र होणार याचा अंदाज बांधता येईल.
“राज्याच्या अर्थसंकल्पात फोलपणा आहे. अर्थसंकल्पात फक्त घोषणांचा पाऊस आहे. हा सर्वसामान्यांना खुश करण्याचा प्रयत्न आहे. पण हे सरकार एकप्रकारे महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक करत आहे. या सरकारने जणू काही हा शेवटचा अर्थसंकल्प असल्यासारख्या घोषणा केल्या आहेत. त्यामुळे वर्ष पूर्ण झाल्यावर लोकांच्या लक्षात येईल”, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
मविआच्या बैठकीत नेमकी चर्चा काय?
“महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सभा घेण्याचे ठरवले आहे. त्याचे नियोजन आम्ही 15 मार्चला करणार आहोत. 2 एप्रिलला महाविकास आघाडीच्या संयुक्त सभेची सुरवात छत्रपती संभाजीनगर येथून होईल. सभेची जबाबदारी अंबादास दानवे, सतीश चव्हाण यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. ही सभा मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळ येथे सभा होईल. मुंबईतील सभा बीकेसी मैदानात घेण्याचा विचार सुरु आहे”, अशी महत्त्वाची माहिती जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर दिली.